बोर्लीपंचतन (मकरंद जाधव) : भारतीय स्त्रीवादाची जननी व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालीका दिनाच्या औचित्याने मंगळवार दि.३ जानेवारी रोजी श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेत दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने ‘रायझिंग डे’ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या निमित्ताने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनींना स्वसंरक्षण, सायबर सुरक्षा, व्यसनाचे दुष्परिणाम यासह नोकरी आणि कायदेविषयक मार्गदर्शन केलं. याबरोबरच शाळा, महाविद्यालय परिसरांमध्ये विद्यार्थिनींच्या बाबतीत होणाऱ्या छेडछाडीच्या प्रकरणामधे अशा लोकांवर तात्काळ कारवाई व्हावी व विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात सुसंवाद वाढावा यासाठी शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या पोलिस दीदी आणि पोलिस काका या उपक्रमाविषयी त्याचबरोबर ११२ नंबर डायल केल्यानंतर संबधीत व्यक्तिला लवकारात लवकर एकाचवेळी सर्व प्रकारची मदत कशी मिळेल याबाबतसुध्दा माहीती देऊन जनजागृती केली.
याप्रसंगी पोलीस शिपाई रसाळ,पोलीस पाटील दिलीप नाक्ति, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.