मुरूडमध्ये चक्री वादळामुळे बागायत क्षेत्रापैकी ७९४ हेक्टर भुईसपाट : नारळास प्रति झाडास २५० रुपये तर सुपारीस ५० रु

अलिबाग : मुरुड तालुक्याचे निसर्ग चक्रीवादळात २५०३ हेक्टर बागायत क्षेत्रापैकी ७९४ हेक्टर भुईसपाट झाल्याने बागायतदार खचून गेला आहे.  पंचनामे पूर्ण झाल्याने मुरूड तालुक्यातील नारळ, सुपारी, आंब्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. नारळास प्रति झाडास २५० रु पये तर सुपारीस ५० रु पये इतकी नुकसानभरपाई देण्यात आली, नुकसानीच्या मानाने शासनाने केलेली मदत कमीच असल्याचे महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतर स्पष्ट दिसत आहे.

नारळाचे बहुतांशी झाप पडल्याने फळधारणा होण्यासाठी झापांची जाळी तयार होईपर्यंत थांबावे लागणार आहे. माडी व्यवसाय करणाऱ्यांवरदेखील संक्रांत आली असून दहापैकी २ ते ३ झाडे माडी काढण्यायोग्य राहिली आहेत. माडी काढताना आधारासाठी माडावर पुरेसे झाप नसतील तर माडी निघत नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. नारळ, सुपारीसारखे हुकमी पीक डोळ्यांंदेखत अस्मानी संकटाने हिरावले असून उर्वरित नारळाच्या झाडांचे उत्पन्न मिळण्यासाठी अद्याप सहा माहिने वाट पाहावी लागणार आहे. उंच माडाची झाडे एकावर एक कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सुपारीचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद आहे. २५ टक्के आंबा बागायत लागवड ५० वर्षांहून अधिक जुनी असल्याने या बागांचे मोठे नुकसान झाले.नवीन बागायत तयार व्हायला किमान १० वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे प्रशासकीय पातळीवर केले. मात्र आंब्याला हेक्टरी ५० हजार, नारळास प्रति झाडास २५० रु पये तर सुपारीस ५० रु पये इतकी नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. २५९० शेतकऱ्यान्ना, अनुदान स्वरूपात वाटप करण्यात आले. खरे पाहता आंब्यापासून सरासरी १० हजार, नारळापासून २ हजार तर सुपारीपासून १ हजार रु. वार्षिक उत्पन्न मिळते. बागायतदारांच्या एकूण क्षेत्रापैकी ३२ टक्के क्षेत्र चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झाले असून बळीराजाला नवीन लागवड केल्यानंतर किमान १० वर्षे उत्पन्न मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे बागायतदारांकडून सांगितले जाते.