पनवेल (संजय कदम) : खारघर आणि कामोठे खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांवर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांचे निर्देशनाखाली व अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांचे नेतृत्वाखाली पनवेल तहसीलदार कार्यालय आणि पोलिसांनी धडक कारवाई करत करोडोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत आठ छोटे आणि मोठ्या बार्ज आणि दोन सेक्शन पंप जप्त करण्यात आले आहेत तर काही सेक्शन पंप जागेवर नष्ट करण्यात आले आहे. तसेच खाडी मधून करोडो रुपयांचा मुद्देमात जप्त करण्यात आला आहे. तसेच पोलीस ठाण्यात अज्ञात वाळू माफियांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
खारघर आणि कामोठे खाडीत कोणतीही परवानगी नसताना बिनधास्त वाळू उत्खनन सुरू होते. अनेक वेळा पनवेलचे तहसीलदार यांनी कारवाई केली मात्र तरीही वाळू उत्खनन सुरूच होते मात्र या वेळेची कारवाई वाळू माफियांची कंबरने मोडणारी आहे. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशनाखाली अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांचे नेतृत्वाखाली पनवेल, तळोजा, खारघर खाडीमध्ये वाळू माफियांविरुद्ध सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये चार मोठ्या बार्ज आणि चार मध्यम बार्ज व दोन छोट्या सेक्शन पंपाच्या बोटी अशा दहा बोटींवर धडक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये खारघर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात सहा बार्ज, एनआरआय पोलिसांच्या ताब्यात दोन बोटी, एक बोट गाळामध्ये फसले असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आली तर एक लहान बोट एनआरआय पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तसेच पाच सेक्शन पंप नष्ट करण्यात आले आहेत.
अशा प्रकारे धडक कारवाई करत कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल पाण्यामधून जप्त करण्यात आला आहे. तसेच संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे