वाहतूक विभाग आयोजित रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद

uran21

उरण ( विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राजाच्या पोलीस प्रशासनाच्या वाहतूक विभागाच्या वतीने महाराष्ट्रभर रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात आले. विविध उपक्रम या प्रसंगी राज्यात राबविण्यात आले. रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती व सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून उरण तालुक्यातील JNPT येथील मल्टिपर्पज हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबीर प्रसंगी पुरुषोत्तम कराड पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग, भागवत सोनावणे-सहाय्यक पोलीस आयुक्त, रवींद्र बुधवंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे, माणिक नलावडे -पोलीस निरीक्षक , विलास पाटील-जिल्हा समादेशक RSP ठाणे रायगड नवी मुंबई विभाग, गिरीश पाटील -अतिरिक्त जिल्हा समादेशक RSP आदी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी सभागृहात अबकड थेटर्स भांडुप येथील कलाकारांनी आपल्या पथनाट्यातून सुरक्षा विषयक जनजागृती केली. या शिबिरात एकूण 89 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदानास NMMC वाशी हॉस्पिटल ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच जे एम म्हात्रे चेरीरिटेबल ट्रस्ट पनवेल व निर्माण डायग्नोस्टिक सेंटर न्यू पनवेल यांच्या वतीने पोलीस अधिकारी -कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले.रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी उरण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी -कर्मचारी, वाहतूक विभागाचे कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.