माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरानमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सध्या तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू आहेत. त्यास काही मूठभर लोकांचा ठाम विरोध आहे. त्यामुळे या ई रिक्षाला समर्थन देणाऱ्या माजी नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या वाहनाला दस्तुरी नाक्यावर पंक्चर करून त्यांचा घात करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तींकडून फसला आहे. याबाबत शिवाजी शिंदेंनी माथेरान पोलीस निरीक्षक शेखर लव्हे त्याचप्रमाणे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, विशेष पोलीस महासंचालक कोकण परिक्षेत्र, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत, अधीक्षक माथेरान आणि नगरपालिका प्रशासक माथेरान यांना निवेदन देऊन संबंधीत अज्ञात व्यक्ती आणि जो कोणी मुख्य सूत्रधार असेल त्यांच्यावर कारवाई करावी या आशयाचे निवेदन दि.३१ डिसेंबर रोजी सादर केले आहे.
शिवाजी शिंदेंनी निवेदनात म्हटले आहे की, माथेरान व परिसरात सामाजिक व राजकीय कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत असून सामाजिक व राजकीय आकसापोटी कुणा माथेफिरू अज्ञात व्यक्तींनी मला जीवे मारण्याची तयारी केली असून मी ई रिक्षाचे समर्थन करीत असल्यामुळे मला लक्ष केले जात आहे. माझा आयशर कंपनीचा टेंपो MH46AF3930 हा माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर दि.२३ डिसेंबर रोजी पार्क करण्यात आला होता माझा भाजीपाल्याचा व्यवसाय असल्याने मी दि.२९ रोजी मध्यरात्री २-४० च्या दरम्यान वाशी मुंबई इथे भाजीपाला खरेदीसाठी निघालो होतो परंतु टेंपो जवळ गेलो असता टेंपोच्या उजव्या बाजूकडील मागच्या टायरला धारदार हत्याराचा वापर करून टायर पंक्चर करण्यात आला होता. तर नुकताच माझ्या ब्रिझा गाडीचे सुध्दा नुकसान केलेले आहे.
मी सामाजिक कार्य त्याचप्रमाणे व्यवसायनिमित्ताने एकटाच रात्री अपरात्री प्रवास करत असतो त्यामुळे भविष्यातील दुष्परिणाम लक्षात घेता माझ्यावर आघात होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसून येत आहेत. अशा घटना भविष्यात माझ्या व कुटुंबियांच्या जीवावर बेतणाऱ्या ठरू शकतात. माझ्या वाहनांचे नुकसान करून मला शारीरिक दृष्ट्या मोठया प्रमाणावर नुकसान करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी संबंधीत अज्ञात व्यक्तींवर आणि यामागे जो कोणी मुख्य सूत्रधार असेल त्यांच्यावर कारवाई करावी असे माजी नगरसेवक शिवाजी शिंदेंनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक शेखर लव्हे आणि अन्य अधिकारी वर्ग याबाबत काय पाऊले उचलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
—————————————
माथेरान मधून ई रिक्षाला समर्थन देणाऱ्या असंख्य स्थानिक लोकांची वाहने दस्तुरी नाक्यावर पार्क असतात त्यामुळेच पुढील काळात असे प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती काळजी घेणे गरजेचे बनले आहे. दस्तुरी नाक्यावर वाहनांमधून पेट्रोल तसेच किंमती सामान चोरी करण्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत.