मुंबई : 300 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या राज्यातील घरगुती वीज ग्राहकांचे लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी सोमवार 10 ऑगस्ट रोजी राज्यभर धरणे आंदोलन केले जाणार वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगडे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्य़ा ग्रामसभेत वीज बिल माफीचा ठराव करून त्याची प्रत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवावी असेही आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसिल कार्यालयासमोर महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे. तसेच वीज बिल माफीच्या रकमेची राज्य सरकारने भरपाई करावी असेही स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिलात 20-30 टक्के सवलत देण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू आहेत. मात्र सध्या सामान्य नागरिकांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे या आर्थिक संकटात घरगुती ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे असा ठराव महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत झाला आहे.