वीज वितरणकडून येत असलेल्या वाढीव बिलामुळे नागरिक त्रस्त : किशोरभाई म्हात्रे यांचा आंदोलनाचा इशारा

नागोठणे (महेश पवार) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना गेल्या काही महिन्यांपासून अव्वाच्या-सवा विज बिले आकारण्यात येत आहेत. त्यामुळेच प्रत्येक महिन्यात येत असलेल्या वाढीव वीज बिलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

कोरोना सारख्या महामारीमुळे गोरगरीब जनतेच्या तोंडचे पाणी पळाले असून गोर गरीब आदिवासी बांधव व सर्वसामान्य नागरिक यांना दोन वेळचे जेवण मिळणे देखील मुश्कीलीचे झाले आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगावर संकट आल्यामुळे जो तो स्वतःचे जीव कोरोनापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोना महामामारीमुळे कंपन्या बंद पडत चालल्या आहेत. कंपनीतील कामगार व ठेकेदार यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कंपनीतून नोकरी गेल्यामुळे कामगार यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंब देखील देशोधडीला लागले आहे. त्यातच भरमसाठ येत असलेल्या वीज बिलामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. गोरगरीब जनतेला पोटाची खळगी भरताना मुश्कील झाले असताना त्यांनी काट कसर करुन आलेले जुलै महिन्याचे वीज बिल आॅनलाईन भरुनही विद्युत मंडळाकडून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. पेण-सुधागड -रोहे तालुक्यातील जनतेची होणारी परवड विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी थांबवावी. तसेच वाढीव बिल दुरुस्त न केल्यास वीज मंडळा विरोधात सर्व जनतेस बरोबर घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी नागोठणे विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ऑगस्ट महिन्याची बिले ही रिडींग नुसार आलेली आहेत. या रिडींग मध्ये माहे मार्च ते ऑगस्ट पर्यंतचा वीज वापर आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मिटर रिडींग घेणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल देण्यात आली होती. तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या काळात ग्राहकांना शुन्य (०) युनिटचे बिल दिले होते. त्यामुळे आता आलेल्या बिलामध्ये ग्राहकांनी भरलेली बिले, आणि स्लॅब बेनिफिट देण्यात आला आहे. व वीजवापर करून राहिलेल्या शिल्लक युनिटचे बिल देण्यात आले आहे. तसेच एकदम बिल भरण्यात येत नसल्याने त्यामध्ये तीन हफ्ते करून देण्यात येत आहेत. तरी काही शंका असल्यास वीज कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहनही वैभव गायकवाड यांनी केले आहे.