ब्रिटिश सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडणार्या वीर भाई कोतवाल तसेच हिराजी पाटील यांचा आज 02 जानेवारी रोजी 80 व्या बलिदान दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करून ‘जगेन तर स्वराज्यासाठी नाहीतर स्वर्गात’ अशी गर्जना करणारे भाई कोतवाल तसेच हिराजी पाटील यांचा अल्पसा परिचय …….
अतिशय गरीब अशा नाभिक कुटुंबात जन्मलेले वीर विठ्ठलराव लक्ष्मण कोतवाल. यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे 1 डिसेंबर 1912 रोजी झाला. त्यांना लोक आण्णा म्हणत. बालपणापासूनच हुशार असलेल्या भाईंनी गरिबीवर मात करत एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण करून ब्रिटिश सरकारमध्ये थोडे दिवस नोकरी केली. परंतु रायगड जिल्ह्यातील मागासलेला कर्जत तालुक्यात सावकाराने गरीब शेतकर्यावर केलेला छळ तसेच आपल्या देशातील गरीब जनतेवर होत असलेले ब्रिटिश सरकार,पोलिसांच्या अत्याचार व सावकारी जुलूम पाहून त्यांचे मन नोकरीत रमेना. शेवटी त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. व आपल्या वकिलीचा धंदा न करता गोर गरीब शेतकरी व जनता यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांच्याबाजुने विनामूल्य कोर्ट कचेर्या केल्या व त्यांना न्याय मिळवून देऊ लागले. भाईंनी ब्रिटिश सरकारच्या अत्याचारापासून जनतेला मुक्त करण्यासाठी तसेच देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी पेशाने वकील असलेल्या भाईंनी ‘जगेन तर स्वराज्यासाठी नाहीतर स्वर्गात’ अशी गर्जना करून 1942 च्या महात्मा गांधींच्या करेंगे या मरेंगेच्या लढ्यात स्वत:ला झोकून दिले व आपला क्रांतिवीर गट स्थापन केला. या गटात तरुणांबरोबरच वयोवृद्धही सहभागी झाले.
या चळवळीत भाई भूमिगत होऊन आगरी व कातकरी समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन ब्रिटीशांविरुद्ध लढू लागले. यामध्ये हिराजी पाटील हे त्यांचे सहकारीही सामील झाले होते. या गटाने ब्रिटिश युद्धसामुग्री ने-आण करणारी रेल्वे बंद पाडण्यासाठी रेल्वे रूळ उखडून टाकले. शस्त्र बनविणारे कारखाने बंद पाडण्यासाठी लाईटचे पोल मुळासकट उपटून ब्रिटिश सरकारची झोप उडवली. ही सर्व कामे भाई आपल्या साथीदारांसमवेत रात्रीच्या प्रहरी करीत. ते कोणती कामे केव्हा करायची हे आपल्या ठराविक विश्वासू साथीदारांशिवाय कोणालाच सांगत नसत. ते आधी आपण करीत असलेल्या कामाची पाहणी करत. मगच आपले काम रात्री पूर्ण करत.
मृत्यूला सतत हुलकावणी देणार्या भाईंनी ब्रिटीशांना वेडावून सोडले. त्यामुळे चिडलेल्या ब्रिटीशांनी भाईंना पकडण्यासाठी जंग जंग पछाडले. पण वीर भाईंना पकडणे एवढे सोप्पे नव्हते. शेवटी ब्रिटीशांनी भाई हाती लागत नाही हे पाहून ब्रिटीशांनी हॉल नावाच्या अधिकार्याला भाईंना पकडण्यासाठी 600 घोडेस्वारांसह पाठविले. भाईनी आपल्या साथीदारांसह सिद्धगडच्या जंगलात भर पावसात राहत असलेल्या या वीरांना गावातील बायका जेवण पोहोचवीत. परंतु त्याची कुणकुण कोणालाही नव्हती. भाई सापडत नाही म्हणून हॉलने लोकांना फितूर करण्याचा प्रयत्न केला. शेवटी व्हायचे तेच झाले! एका माथेफिरुने फितुरी करून भाईंचा पत्ता दिला. लगेचच भाई लपून बसलेल्या सिद्धगडला 2 जानेवारी 1943 रोजी पहाटे ब्रिटीशांचा वेढा पडला. भाई तिथे असल्याची खात्री पटताच ब्रिटीशांनी अंदाधुंदी गोळीबार केला. आपल्या साथीदारांसह हिराजी पाटील व भाईंच्या शरीराची चाळण झाली. भाई धारातीर्थ पडले….ब्रिटीशांना नेस्तनाभूत करणारा मराठी देह धरणीवर कोसळला….तरीही एकाही ब्रिटिश अधिकार्याची बराच वेळ त्यांच्याजवळ जाण्याची हिम्मत होत नव्हती. यावरूनच भाईंची भीती किती होती, याची कल्पना येते. भाई धारातीर्थ पडले असतानाही ब्रिटीशांनी त्यांचे खूप हाल केले. या देशासाठी बलिदान देणार्या या शूर नाभिक वीर तसेच हिराजी पाटील व त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या बलिदानदिनी विनम्र अभिवादन….