अयोध्या : आज इतिहास रचला जात आहे. कन्या कुमारीपासून क्षीर भवानिपर्यंत, सोमनाथपासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयेपासून अमृतसरपर्यंत, लक्ष्यद्विपपासून लेहपर्यंत संपूर्ण भारत राममय आणि प्रत्येक मन दीपमय आहे. शतकांची प्रतीक्षा आज संपत आहे. राम जन्मभूमी आज मुक्त झाली आहे. अनेक वर्षे रामलला टेंटमध्ये होते. मात्र, आता भव्य मंदिर उभारले जात आहे, असे प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत केले. मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन झाले. यावेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदिबेन पटेल, नृत्यगोपालदास महाराज, चंपतरायजी आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रोच्चारात चांदीच्या विटा ठेऊन राम मंदिराचे भूमिपूजन केले. आज कोट्यवधी भारतीयांची इच्छा आणि आशा पूर्ण झाली. आजच्या या पावन क्षणी सर्वांचे खूप-खूप अभिनंदन. आजच्या दिवसाचा स्वर संपूर्ण जग ऐकत आहे, असे मोदी म्हणाले. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्याची मला राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे संधी दिली. मी त्यांचे आभार मानतो. शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या चक्रातून आज राम जन्मभूमी मुक्त झाली, असे मोदी म्हणाले.
पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यासाठी आंदोलने झाली. 15 ऑगस्टचा दिवस त्या आंदोलनांचा आणि हुतात्म्यांच्या भावनांचे प्रतिक आहे. अगदी त्या प्रमाणेच राम मंदिरासाठीही अनेक शतके अनेक पिढ्यांनी प्रयत्न केले. आजचा हा दिवस त्याच तपाचे आमि संकल्पाचे प्रतिक आहे. राम मंदिराच्या आंदोलनात संघर्ष आणि संकल्प होता. राम मंदिरासाठी चाललेल्या आंदोलनात अनेक लोकांचा अर्पण भाव आणि संघर्ष होता. मी देशातील 120 कोटी नागरिकांच्या वतीने नतमस्तक होऊन नमन करतो.
राम आपल्या मनात एकरूप झाले आहेत. कुठलेही काम करायचे असेल तर आपण प्रेरणेच्या रुपात रामाकडेच बघतो. आपण प्रभू रामांची अद्भूत शक्ती पाहिली आहे. इमारती नष्ट झाल्या, काय जाले नाही, अस्तित्व नष्ट करण्याचे सर्व प्रयत्न झाले. मात्र, राम आजही आमच्या मनात आहेत. आपल्या संस्कृतीचे आधार स्तंब आहेत. श्रीराम भारताची मर्यादा आहेत. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. याच पार्श्वभूमीवर आज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले आहे.
हे राम मंदिर राष्ट्रीय भावनेचे तसेच संस्कृतीचे आधुनिक प्रतिक असेल. कोटी लोकांच्या सामूहिक संकल्पतेचे प्रतिक असेल. हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांसाठी आस्थेचे प्रतिक असेल आणि राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळत राहील. जेव्हा जेव्हा मानवतेने प्रभू रामचंद्रांना मान्य केले, तेव्हा विकासच झाला आहे आणि जेव्हा आपण भरकटलो तेव्हा आपला विनाश झाला आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांच्या भावनांची काळजी घेत, सर्वांना सोबत घेत, विकास करायचा आहे, असे मोदी म्हणाले.