माथेरान (मुकुंद रांजाणे) : शालेय जीवनात खरे तर अभ्यासक्रम करतांना खूपच कंटाळवाणा यायचा नेहमीचाच तो गृहपाठ आणि अभ्यास करताना पुस्तकांचा कंटाळा, शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना जर का अभ्यास केला नसेल तर छडीचा मार खावा लागत होता. कधी एकदाच ह्या त्रासातून मुक्ती मिळते असेच वाटायचं आपले शिक्षण लवकर पूर्ण होउदे मग आराम करू असेही मनोमन वाटायचं पण आता तेच बालपण पुन्हा एकदा मिळावे असे वाटायला लागले आहे.
कारण जी मजा जो आनंद शालेय जीवनात असतो तो कुठेही सापडत नाही. ते जुने मित्र,मैत्रिणी यांच्यासोबत केलेली थट्टा मस्करी, वर्षातून एकदा कुठेतरी जवळपास शालेय सहल काढली जायची त्यात आपण स्वतःहून केलेला स्वयंपाक शिक्षकांना देऊन आपल्या गटाला किती मार्क मिळतात याची उत्सुकतेने वाट पहायची. वार्षिक स्नेहसंमेलनात भाग घेऊन आपली कला सादर करण्यात जो काही आनंद मिळायचा तो शालेय जीवना नंतर पुढे स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर विरून गेला आणि भविष्यात काहीतरी नवीन करण्यासाठी जी काही धडपड सुरू झाली त्यात सर्वकाही गर्द धुक्याप्रमाणे दिसेनासे झाले होते. परंतु नुकताच दोन दिवस शालेय स्नेहसंमेलन पार पडले त्यात सर्व मित्र मैत्रिणी एकाच व्यासपिठावर आल्याने जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्व माजी विद्यार्थी आतुरलेले दिसत होते.
सन १९५०/५५ मध्ये त्याकाळी इथल्या स्थानिक नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत चौथी पर्यंत शिक्षण घेतल्यावर पुढील शिक्षणासाठी काहीच पर्याय उपलब्ध नव्हता त्यासाठी शिक्षण महर्षी स्व. बाबासाहेब गव्हाणकर यांनी इथली भौगोलिक परिस्थिती पाहून सन १९६९ साली सरस्वती विद्या मंदिर ही दहावीपर्यंत शाळा सुरू केली आणि इथे खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा आणली.त्यामुळेच आज ह्या दुर्गम भागात अनेक विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभे राहता आले आहे. अनेकांनी विविध क्षेत्रात आपले करियर निर्माण केले आहे. कुणी शैक्षणिक क्षेत्रात तर कुणी सामाजिक, राजकीय क्षेत्रात सुध्दा आपला ठसा उमटवला आहे.
इथला सर्वसामान्य विद्यार्थी आज उच्चपदावर आहे ते केवळ शिक्षण महर्षी बाबासाहेब गव्हाणकर यांच्या शाळेमुळेच. मागील काही वर्षात गव्हाणकर ट्रस्ट या शाळेची इमारत मोडकळीस आल्यामुळे काही वर्ग हे नगरपरिषदेच्या शाळेतील अन्य वर्गात भरवले जातात. परंतु जुनी शाळा ही सर्व माजी विद्यार्थ्यांना नेहमीच खुणावत होती त्यासाठी जवळपास चार दशकानंतर काही माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे विश्वस्त दादासाहेब गव्हाणकर यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शालेय पोशाख परिधान करून वर्गातील बाकांवर बसून माहिती घेत होते तर काहींनी शाळेच्या मैदानावर कवायती सुध्दा करून आपल्या शालेय जीवनातील बालपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सरस्वती विद्या मंदिर ही सर्वांची जुनी शाळा दुरुस्तीचे कारण पुढे करून बंद केली आहे की काय असाच प्रश्न नागरिक, पालक माजी विद्यार्थी नेहमीच विचारत होते यासाठी आम्ही शाळेचे विश्वस्त शशिभूषण गव्हाणकर यांच्याकडे याबाबत सविस्तर चर्चा केली असता त्यांनी ही आपली शाळा पुन्हा एकदा आपल्या सर्वासाठी येत्या २६ जानेवारी रोजी झेंडावंदन झाल्यावर २७ जानेवारी पासून सुरू करणार आहोत असे आश्वासन दिले आहे.