पेण (राजेश प्रधान) सरकारी काम आणि सहा महिने थांब या युक्तीप्रमाणे शासनावर अवलंबून न राहता शेती व भाजीपालाच्या लागवडीसाठी पाण्याची उपलब्धता होण्याकरिता पेण तालुक्यातील खरोशी व दुरशेत ग्रामस्थांनी श्रमदानातून मातीचा बंधारा बांधला आहे.
पाणी आडवा पाणी जिरवा या अंतर्गत बाळगंगा नदीमध्ये खरोशी व दुरशेत गावातील शेकडो शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन श्रमदानाने मातीचा बंधारा बांधून शेतजमीन ओलीता खाली आणण्यासाठी पुढाकार घेतला. फावडे, टिकाव व घमेले घेऊन महिला व पुरूष मंडळींनी एकत्र श्रमदान करून बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केली. या बंधा-याच्या कामाचे उद्घाटन खरोशी सरपंच रूपाली महेश पाटील दुरशेत सरपंच दशरथ गावंड यांच्या हस्ते नारळ फोडून केला.
यावेळी कृषी संशोधक के.डी.पाटील ग्राम पंचायत सदस्या बेबीताई मोहन भोंडकर, ए.पी.पाटील, भरत पाटील, जनार्दन पाटील, महेश पाटील आदींसह शेतकरी व ग्रामस्थ हजर होते.
गेली अनेक वर्ष हा बंधारा मातीने बांधला जात असल्याने पावसाळ्यात पूराचा फटका त्याला बसून तो वाहून जातो. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून हा बंधारा पक्का तयार करून लवकरात लवकर बांधून देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खरोशी सरपंच रूपाली पाटील व दुरशेत सरपंच दशरथ गावंड यांनी दिली.
—————————–
खरोशी गाव हा शेतीसाठी व भाजीपालासाठी प्रसिद्ध आहे. पाणी आडवा पाणी जिरवा या मोहिमे अंतर्गत बंधारा बांधून भाजीपाल्याचे शेतकऱ्यांचे उत्पन्न नककीच वाढ होणार आहे.