मुंबई (शांताराम गुडेकर) : मी ३७ वर्षे शिक्षक म्हणून वावरलो. त्यातील ७ वर्षे मु्ख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली. हे करताना ३७ वर्षे कशी संपली ते कळलेही नाही. चित्रकलेचा शिक्षक असताना अन्य शिक्षकांच्या अनुस्थितीच्या तासाला मी वर्गावर जाऊन मुलांशी हितगुज साधताना त्यांना गोष्टी सांगत असे. त्या मुलांत मी रममाण होत असे. त्यांच्यासोबत मी खेळलो आहे, हसलो आहे, रडलो आहे..अशा शब्दात कल्याण येथील नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, विख्यात कथाकथनकार, चित्रकार श्रीधर केळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कल्याण येथील ज्ञानमंदिर हायस्कुलच्या १९७८ साली एस एस सी झालेल्या व १९७२ साली इयत्ता पाचवीपासून एकत्र आलेल्या तत्कालिन विद्यार्थ्यांच्या ‘मैत्रीची पन्नाशी’ या कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने ते रामबाग, कल्याण येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात(दि.४ डिसेंबर ) बोलत होते. या प्रसंगी विचारमंचावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या सचिव सौ चित्रा बाविस्कर, सौ. सरिता केळकर याही उपस्थित होत्या.
यावेळी श्री केळकर यांचा या सर्व माजी विद्यार्थ्यांतर्फे शाल, सन्मानपत्र, भेटवस्तू, वस्त्रप्रावरणे देऊन गुरुपूजन करीत प्रमुख पाहुण्या सौ. चित्रा बाविस्कर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रदीर्घ शासकीय सेवा बजावत असतानाच उच्च शिक्षण घेत, प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळीत लिखाण, संगीत याही क्षेत्रात रुची दाखवल्याबद्दल सौ. बाविस्कर यांना सन्मानपत्र, भेटवस्तू, महावस्त्र देऊन श्री केळकर यांच्या हस्ते यावेळी गौरवण्यात आले. इसापाच्या कथा तंत्राचा अभ्यास करत त्यातील नितीचा संदेश लक्षात घेऊन आपणही कथा रचल्या असे सांगत तमाम प्राणीपक्षी शिस्त, प्रामाणिकपणे आपापले आयुष्य व्यतीत करत असताना मनुष्यप्राणी मात्र आजकाल अनितीवर आधारीत वर्तन करतो याबद्दल खंत व्यक्त करीत नितीच्या गोष्टी कुणीतरी सांगायला पाहिजेत म्हणून आपण कथाकथनाचे कार्यक्रम करत गावोगावी फिरल्याचे श्री केळकर यांनी यावेळी नमूद केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या या नात्याने केलेल्या भाषणात गुरुचे महत्व विविध पौराणिक दाखले देऊन बाविस्कर यांनी विशद केले. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात विविध संघर्ष करीत असतानाही आपले माजी शिक्षक यांची कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवणाऱ्या ज्ञानमंदिर हायस्कुलच्या मित्रमैत्रीणींचा उल्लेख “दुःख अडवायला उंबऱ्यासारखा..मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ अशा शब्दात त्यांनी केले.
उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना यावेळी अध्यक्ष व पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र व ‘मैत्रीच्या पन्नाशी’चे सुबक संस्मरणचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सौ. बाविस्कर यांनी सर्वांना यावेळी पितळी दिव्यांची भेट दिली. कार्यक्रमाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष शरद ननावरे यांनी यावेळी कराओके वर गीते सादर केली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन माजी विद्यार्थी राजेंद्र घरत यांनी केले.