शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये ओंबळीचे के.के.उर्फ कृष्णा कदम यांच्या प्रवेशामुळे कलाटणी

kk-poladpur
पोलादपूर (शैलेश पालकर) : पोलादपूर तालुक्यातील बहुतांशी लोकसंख्येला आता केवळ निवडणुकांच्या राजकारणासोबत पक्षांतराच्या कोलांटउडया घेऊन काही वेगळे चित्र निर्माण होते काय, याची प्रतिक्षा लागली आहे. पोलादपूर तालुक्यातील पहिल्या टप्प्यात चार दुसऱ्या टप्प्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम उद्या मतदानाने संपुष्टात येऊन केवळ मतमोजणीची प्रक्रिया मंगळवारी पार पडत असताना पुढील वर्षीची सुरूवात जिल्हा परिषद न् पंचायत समितीच्या निवडणुकीने होणार असल्याने पोलादपूरकरांना या निवडणुकांचे वेध लागले आहेत. काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे पराभूत उमेदवार के.के. उर्फ कृष्णा कदम यांनी नुकताच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश घेतल्याने लोहारे जि.प. गटामध्ये आता राजकीय कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी के.के. मित्रमंडळ या सामाजिक सेवाभावी तरूणांच्या सामूहिक प्रयत्नांतून ओंबळीतील काँग्रेस कार्यकर्ते कृष्णा कदम यांनी चांगले काम केले होते. यामुळे त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये महत्वपूर्ण भुमिका घेण्याची संधी मिळाली. काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या अपर्णा सुभाष जाधव यांच्या 6253 मते मिळवित कोंढवी जिल्हा परिषद गटातील विजयावेळी प्रमुख कार्यकर्त्याची भुमिका पार पाडणाऱ्या के.के. उर्फ कृष्णा कदम यांना त्यानंतरच्या म्हणजेच मागील निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून थेट उमेदवारीची संधी मिळाली.
मात्र, जिल्हा परिषद सदस्या अपर्णा सुभाष जाधव यांच्या विजयामध्ये 1137 महत्वपूर्ण मतदान पोलादपूर शहराचे होते आणि पोलादपूर शहरातून दिलीप भागवत यांनी पंचायत समितीची उमेदवारी लढल्याने ही 3235 मते अपर्णा जाधव यांनादेखील मिळाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत असताना यातही के.के.उर्फ कृष्णा कदम यांच्या सातत्यपूर्ण समाजसेवेचा संदर्भ दिला जात होता. मात्र, त्यानंतर पोलादपूर नगरपंचायतीची निर्मिती होऊन पोलादपूर शहरातील मतदान हे या कोंढवी जिल्हा परिषद गट आणि लोहारे पंचायत समिती गणातून वगळण्यात आले आणि लोहारे जिल्हा परिषद गट आणि लोहारे पंचायत समिती गण अस्तित्वात आले.
2017 मध्ये शिवसेनेचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांचा पारंपरिक देवळे जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव झाल्याने त्यांनी लोहारे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी केली. त्यांना याठिकाणी काँग्रेसचे के.के.उर्फ कृष्णा कदम यांच्याविरूध्द लढत द्यावी लागणार होती. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पारडे वरचढ असताना अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष जाधव म्हणजे आधीच्या काँग्रेस उमेदवार अपर्णा जाधव यांच्या पतीची उमेदवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला सुरूंग लावणारी ठरली होती. दुसरीकडे, काँग्रेसला पोलादपूर शहरातून मिळणाऱ्या 1 हजारांपेक्षा अधिक मतांची साथ नगरपंचायतीच्या निर्मितीमुळे नव्हती. शिवसेनेच्या संजीवनी मोरे यांना याठिकाणी अपर्णा जाधव यांच्या विरोधात 5298 मते मिळाली होती.
त्यामुळे काँग्रेसची 6253 मते ही मतविभागणीशिवाय घटणार नसल्याचे चित्र स्पष्ट असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष जाधव यांची उमेदवारी 1102 मते मिळाल्याने काँग्रेसचा घात करणारी ठरली. यातही नोटा साठी पडलेल्या 197 मतांनी निवडणुकीचा निकाल फिरवला. चंद्रकांत कळंबे यांना 5679 मते मिळाली यामध्ये पंचायत समितीचे सायली सतीश शिंदे 2499 आणि यशवंत कासार 3058 यांच्या मतांचा प्रभाव दिसून आला आणि पूर्वीच्या 2012 च्या उमेदवार संजीवनी मोरे यांच्या 5298 मतांपेक्षा चंद्रकांत कळंबे यांची मते अधिक भरली शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीरतेमुळे काँग्रेसचे के.के.उर्फ कृष्णा कदम यांना 4599 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष जाधव 1102 मते मिळून पराभवाला सामोरे जावे लागले होते.
आता पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे रणशिंग येत्या 2023 मध्ये काुंफ्कले जाणार असताना या लोहारे जि.प. गणातील शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी शिंदे गटासोबत राहून पारंपरिक जिल्हा परिषदेच्या देवळे गटाची वाट धरली आहे. काँग्रेसचे पराभूत उमेदवार के.के.उर्फ कृष्णा कदम यांनी डिसेंबर 2022च्या प्रारंभी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस संपुष्टात येईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. पोलादपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभावी नसून काँग्रेस पक्षाचे काही मातब्बर नेतेदेखील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत विविध आंदोलनांमधून तसेच कार्यक्रमांमधून हजेरी लावत असल्याने काँग्रेसचे भवितब्य कसे असेल, याचा राजकीय अंदाज बांधला जात आहे.
मात्र, प्रत्येकाला आपला पक्ष जगविण्याचा अधिकार असल्याने आगामी काळात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना या चारही प्रमुख राजकीय पक्षांना मतदानाची आकडेवारी निश्चित करायची असताना भारतीय जनता पक्ष तसेच शेतकरी कामगार पक्षदेखील त्यांचे मतदान वाढविण्यासाठी उमेदवार देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सगळया पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील दुसऱ्या टप्प्याची ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्याऐवजी थेट जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणामध्ये काय होऊ शकेल, याचीच चाचपणी राजकीय विश्लेषकांकडून सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *