पनवेल (संजय कदम) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या पाठपुराव्यामुळे कळंबोली वसाहतीमधील सेक्टर १ मधील ड्रेनेज लाईनचा प्रश्न निकाली लागला असून यामुळे शेकडो रहिवाश्यांची दुर्गंधीतून सुटका झाली आहे.
कळंबोली वसाहतीमधील सेक्टर १ या ठिकाणी साठलेल्या ड्रेनेजमुळे मोठ्या दुर्गंध निर्माण झाली होती तसेच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात तेथील रहिवाश्यांनी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली वसाहत शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर यांची भेट घेऊन त्यांच्या समोर वस्तुस्थिती मांडली. तातडीने शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांच्यासह उपशहर प्रमुख सौ.मनिषा प्रकाश वचकल, विभाग प्रमुख सौ.नंदा दिलीप जाधव या पदाधिकाऱ्यांनी पनवेल महानगरपालिकेचे वार्ड अधिकारी कवठे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हि समस्या मांडली.
सिडकोच्या गलथान कारभारामुळे ड्रेनेज लाइनच्या मेनरोडवरील ड्रेनेजची झाकणे खराब झाल्याने आतील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अन्यथा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
या तक्रारीची दखल घेऊन त्वरित सदर ठिकाणी पनवेल महापालिकेचे अधिकारी शिंदे व त्यांच्या पथकाने ड्रेनेज साफ करणाऱ्या वाहनासह तेथे पोहचून तातडीने ड्रेनेज मोकळे करून दिल्याने हा प्रश्न निकाली निघाला आहे. याबद्दल नागरिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.