शेतकऱ्याच्या पाठीशी शासन : पालकमंत्री एकनाथ शिंदे

thane1

ठाणे : शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे,असा विश्वास नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी बांधवांना दिला.

महानगरपालिका मैदान डवले नगर  येथे आयोजीत केलेल्या  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य – नाचणी, कार्यशाळा, प्रदर्शन व  विक्री स्टॉलचे  उद्घाटन  नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, महिला अर्थिक विकास अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, विभागीय कृषी सहायक संचालक प्रमोद लहाने आदी  उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री .शिंदे म्हणाले की, विकेल ते पिकेल या धोरणांतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन  मिळत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था  करण्यात येत आहे.त्यामुळे शेतकरीबांधवांना याचा  फायदा होत आहे.कोरोना काळात शेतकऱ्याचे खुप नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनामार्शेफत शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असेही श्री शिंदे यांनी सांगितले.

आजच्या या आठवडी बाजार ठिकाणी  ठाणे जिल्ह्यातील 31  शेतकऱ्यांनी आपले स्टॉल लावले होते .सर्व स्टॉलला मान्यवरांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाबरोबर राष्ट्रीय सुरक्षा अभियाना अंतर्गत पोष्टिक तृणधान्य उत्पादन कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व नाचणी या पिकाची विक्री व प्रदर्शन आणि त्या पिकाचे आरोग्य विषयी महत्व दाखवणारे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलेले आहे. यावर नाचणी, वरी या पिकांचे उत्पादन प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल या धोरणा अंतर्गत संत शिरोमणी सावंता माळी रयत बाजार अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. या  योजने अंतर्गत ठाणे शहरातील 6 ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने व सहाकार्याने आठवडीबाजाराचे आयोजन करण्यात येत आहे. या आठवडी बाजारामध्ये ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर व मुरबाड या तालुक्यातील व नजिकच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला भाजीपाला, फळधान्य, कडधान्य व इतर प्रक्रियायुक्त शेत मालाची थेट विक्री शहरातील ग्राहकांना करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला दर मिळणार आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांना सुध्दा वाजवी दरामध्ये चांगला भाजीपाला, फाळे व चांगली धान्य व कडधान्य मिळणार आहेत. या आठवडी बाजारामध्ये तांदूळ, नाचणी, वरी, कडधान्य तसेच भेंडी, गवार, मिरची,दूधी, कारली, मेथी, कोथिंबीर इत्यादी भाजीपाला तसेच स्थानिक फळ बाणि महिला बचत गटामार्फत प्रक्रिया केलेले लोणचे, पापड, चटणी, डाळींपिठ इत्यादी प्रक्रिया केलेले उत्पादने वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत.

दि. 24 जानेवारी 2021 रविवार सकाळी 7.00 वा ते दुपारी 12.00 वा. कोलबाड येथील जाग माता मंदीर आणि सृष्टी बिल्डिंगच्या मधील रस्त्याची मोकळी जागा, ठाणे महानगरपालिका, मदार्ड-कोलबाड तलावाच्या जवळ, कोलबाड, ठाणे (प.).

दि. 24 जानेवारी 2021 रविवार दुपारी 3.00 वा ते  8.00 वा. महानगरपालिका भाजी मंडई, एस.आर.ए. इमारतीच्या गेट मधील मोकळी जागा, ग्लोडी अल्वारीस रोड, खेवरा सर्कल, पांखरण रोड नं.2,  ठाणे (प.).

दि. 28 जानेवारी 2021 गुरुवार सायंकाळी 4.00 वा ते  8.00 वा. श्री. छत्रपति शिवाजी महाराज मैदान, तलावपाली जवळ, ठाणे (प.).

नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.