मुंबई : ही संतापजनक घटना युपी किंवा महाराष्ट्राच्या दुर्गम भागात घडलेली नसून चक्क देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील घाटकोपर येथे घडली आहे. येथे एका 28 वर्षीय गर्भवती महिलेसह तिच्या 11 वर्षांच्या मुलीवर दोन पोलीस शिपायांनी लैंगिक अत्याचार केला. यासंबंधीची तक्रार एका सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात दोन कॉन्स्टेबलसह एका रिक्षाचालकाविरुद्ध बलात्कार, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गर्भवती महिलेला या नराधमांनी काठीने मारल्याने तिचा गर्भपातही झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुंबई पोलीस दलाला काळीमा फासणारे हे दोघेही कॉन्स्टेबल घाटकोपर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. केलेल्या कृत्याची कुणाकडे वाच्यता केल्यास जिवे ठार मारू अशी धमकी या महिलेला दोघांनी दिली होती, म्हणून ही महिला घाबरून तक्रार देण्यासाठी पुढे आली नव्हती. अखेर घाटकोपरमध्ये राहणार्या या महिलेच्या वतीने हेल्पकेअर फाऊंडेशनने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
आरोपी पोलिसांनी 12 जानेवारी 2020 रोजी महिलेला धमकावले. त्यानंतर 15 जानेवारी रोजी रात्री 10 च्या सुमारास 11 वर्षांच्या मुलीसोबत घरी असताना, दोघे पोलीस कान्स्टेबल आणि रिक्षाचालक तिच्या घरी आले. त्यावेळी तक्रारदार महिला अडीच महिन्यांची गर्भवती होती. आरोपी पोलिसांनी दोघींना मारहाण करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे