संतापजनक! डॉक्टर आणि अ‍ॅम्ब्युलन्स वेळेवर न मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू, खालापुरातील घटना

खालापूर : एका गरोदर आदिवासी महिलेला मोठ्याप्रमाणात प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर वेळेवर डॉक्टर आणि अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात घडली आहे. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेचा रायगड जिल्ह्यातील ढीसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

खालापूर तालुक्यातील हाळ आदिवासीवाडीतील सात महिन्यांची गर्भवती महिला शांती राहुल वाघमारे हिला प्रचंड वेदना होऊ लागल्या. यानंतर तिची आई रतन वाघमारे आणि घरातील अन्य नातेवाई आशा सेविकेच्या मदतीने अ‍ॅम्ब्युलन्स शोधू लागल्या, मात्र ती उपलब्ध न झाल्याने शांतीला रिक्षातून खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या केंद्रात डॉक्टर नसल्याने चौक रूग्णालयात तिला घेऊन जाण्याचा सल्ला येथील कर्मचार्‍यांनी दिला.

परंतु, चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल नेण्यापूर्वीच शांतीचा मृत्यू झाला. खालापूर आरोग्य केंद्रात वेळेवर डॉॅक्टर उपलब्ध झाला असता तर शांतीचा जीव वाचू शकला असता. मुलीच्या मृत्यूनंतरही रतन वाघमारे यांची परवड थांबली नाही, चौकवरून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हाळवाडीत मृतदेह नेण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सवाला 6000 रुपये मागत होता. यामुळे जि.प. सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला, त्यांनी अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्यानंतर मृतदेह घरी आणण्यात आला.

तहसीलदार इरेश चप्पलवार यानी मंगळवारी सकाळी वाघमारे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. रविवारी संपर्क केला असता तर उपचारासाठी प्रयत्न करता आले असते, असे तहसीलदार म्हणाले. दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.