बोर्लीपंचतन (मकरंद जाधव) : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे अखंड आगरी समाज मंदिर सभागृहाचे व दिघी येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी योजना त्याचबरोबर तळई मोहल्ला येथील अंतर्गत रस्त्याचे भुमीपूजन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते रविवार दि.४ डिसेंबर रोजी पार पडले.
बोर्लीपंचतन येथील अखंड आगरी समाज मंदीर सभागृहाच्या विस्तारित कामासाठी रिलायन्स कंपनीच्या सीआरएस फंडातून पंचवीस लाख रुपयांचा निधी खा.सुनिल तटकरे यांनी उपलब्ध करुन दिल्याबद्दल बोर्लीपंचतन अखंड आगरी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना तटकरे यांनी सांगितलं की तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे या मतदारसंघात अनेक योजनांची सांगड घालून विकास कामांसाठी समर्पित भावनेने तुमच्यासाठी काम करत आहे. आज वेगवेगळी समाज सभागृह आहेत पण त्या समाज मंदिरांचा वापर विविध सामाजिक कार्यासाठी होऊन या वास्तु सतत चालत्या बोलत्या राहील्या तरच समाजाच्या व्यापक हितासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन उद्याच्या भविष्याचा वेध घेण्याची ताकद या समाज मंदिराच्या माध्यमातून नक्कीच होईल.
समाज मंदिर पूर्ण झाले म्हणजे आपल काम संपलं असं नाही तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी या पंचवीस लाखाच्या सहभागृहाच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींसाठी विविध उद्योग उभे राहून मोठी आर्थीक उलाढाल या महिलांसाठी झाली पाहिजे यासाठी आपण सर्वांच्या सहकार्याने निश्चितच प्रयत्नशील राहू.
याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच ज्योती परकर आगरी समाज अध्यक्ष वैभव पाटील, उपाध्यक्ष संतोष कांबळे, महिला अध्यक्षा शितल पाटील, उपाध्यक्षा वंदना गायकर, सुजित पाटील, गणेश पाटील, सुशिल पाटील, संतोष गायकर, विष्णू धुमाळ, शंकर गाणेकर, आगरी समाजाचे सहा पाटील, दिवेआगर सरपंच उदय बापट, राष्ट्रवादीचे दर्शन विचारे, मंदार तोडणकर, नंदकुमार पाटील, सुचिन किर, म्हसळा राष्ट्रवादीचे महादेव पाटील व आगरी समाज बांधव महीला भगीनी उपस्थित होत्या.