उरण (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथे असलेल्या जेट्टी जवळ समुद्रात नांगरून ठेवलेल्या बोटीला आज मंगळवार दिनांक 6/12/2022 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली.
बोटीमध्ये कामगार जेवण बनवित होते. त्या दरम्यान स्टो ने पेट घेतल्याने सदर बोटीस आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे. जवळ जवळ अंदाजे 60 ते 70 लाखाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
करंजा बाबदेव पाडा येथील रहिवाशी गजानन लक्ष्मण कोळी यांची हि बोट आहे. आग लागल्यावर आगीचा प्रचंड भडका उडाला. या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलामार्फत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र बोट जळून खाक झाली. करंजा बंदरात या अगोदरहि अशा बोटीना आग लागण्याचे प्रकार घडले असून करंजा बंदरातील बोटीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.