माथेरान (मुकुंद रांजाणे) : पर्यटकांचे आवडते प्रदूषणमुक्त, गारेगार, अल्हाददा यक पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी येथे आज पासूनच पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळणार आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले आहेत.
मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात. कोरोना काळात माथेरान एकदम सुन्न होते. कोरोना नंतर माथेरान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले तेव्हापासून खूप कमी प्रमाणात पर्यटक येत होते. मात्र यावर्षी दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. यावर्षीच्या नववर्षाच्या स्वागतासाठी आज शुक्रवार पासून माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळणार आहे.
अनेक हॉटेल्स व लॉजमध्ये पर्यटकांनी अगोदर पासूनच रूम बुक केले आहेत. पर्यटकाना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये यासाठी मिनिट्रेन सेवे बरोबरच नव्याने सुरू झालेली ई-रिक्षाची सेवा देखील सुरळीत सुरू आहे. नेहमी वाहनतळावर पार्किंग व्यवस्था गंभीर असायची मात्र यावेळेला वन विभागामार्फत, वनसमिती अध्यक्ष योगेश जाधव, वनपाल रामकुमार आडे, नगरपरिषदेच्या प्रशासक सुरेखा भणगे यांनी नियोजनबद्ध काम केल्याने येणाऱ्या पर्यटकांना वाहनतळात कोणताही समस्या भेडसावताना दिसणार नाही. येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेसाठी व्यावसायिक सुद्धा आपली दुकाने सज्ज करून तयार आहे.
आल्हाददायक वातावरण
यावेळेला पाच महिने पाऊस पडल्यामुळे वातावरण अगदी आल्हाददायक झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून माथेरानमध्ये गुलाबी थंडी जाणवू लागली. हळूहळू तापमनात घट होताना जाणवत आहे. त्यामुळे येथे या शेवटच्या आठवड्यात आलेल्या पर्यटकांना गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे.
नाताळ व नववर्षानिमित निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई
माथेरानमध्ये नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी येथील हॉटेल व्यवस्थापनाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपआपल्या हॉटेल्समध्ये रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केलेली पहावयास मिळत आहे. काही हॉटेल व्यवस्थापनाने केकची व्यवस्था सुद्धा केलेली आहे.