सर्व्हिसरोडवर लाखोंची काँक्रीटभिंत आणि अंडरपास हायवेला फक्त सिमेंट फोमिंग, पोलादपूर शहरात एलऍण्डटी कंपनीचा अजब कारभार

road-poladpur
पोलादपूर (शैलेश पालकर)  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरून पोलादपूर शहर आता बेपत्ता झाले असून पोलादपूर शहरातील महामार्गाच्या कामाची अनाकलनीयरित्या वासलात लावण्यात स्थानिक राजकारण्यांसोबत ठेकेदार एलऍण्डटी कंपनीने देखील पुढाकार घेतल्याचे उघड झाले आहे. पोलादपूर शहरातील पूर्वेकडील सर्व्हिसरोडवर लाखोंची काँक्रीटभिंत आणि अंडरपास जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला फक्त सिमेंट फोमिंग केल्याचे विचित्र चित्र दिसत आहे तसेच मातीच्या बॉक्सकटींगवर केलेल्या सिमेंटफोमिंगवर संरक्षक कठडे बसविण्यासाठी चक्क काँक्रीटचे आडवे लांबलचक वजनदार बीम बसविल्याचेही अभियांत्रिकी तज्ज्ञांना आव्हान देणारे बांधकाम केल्याचे दिसून येत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील शेवटचे शहर अशी अनेकवर्षे असलेली ओळख काही मोजक्याच राजकीय व्यक्ती आणि व्यावसायिकांमुळे पुसली जाऊन अंडरपास जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे पोलादपूर शहर आता केवळ पूर्व आणि पश्चिमेकडील सर्व्हिसरोडच्या एकाच बाजूला वसलेले दिसून येत आहे. या दोन्ही सर्व्हिसरोडच्या दुसऱ्या बाजूला महामार्गासाठी बॉक्सकटींग करून केलेला अंडरपासचा खंदक आहे. पोलादपूर येथील रयत विद्यामंदिराच्या इमारतीलगतचा रस्ता सर्व्हिसरोडच्या रूंदीकरणामध्ये कापल्यानंतर येथील लालमातीचा ढिगारा सर्व्हिसरोडवर कोसळू नये यासाठी लाखो रूपये खर्च करून काँक्रीटची संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. यासाठी राजकीय आणि माध्यमांचा दबाव वापरण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, अंडरपासमधील खंदकातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट फोमिंग केलेल्या बॉक्सकटींगमधून अनेकवेळा लालमातीचे ढिगारे कोसळूनही याठिकाणी काँक्रीटच्या भिंती बांधण्यात आल्या नाहीत.
याउप्पर, या सिमेंट फोमिंग केलेल्या बॉक्सकटींगच्या वरील बाजूला असलेल्या पूर्व आणि पश्चिमेकडील सर्व्हिसरोडवर लोखंडी संरक्षक कठडे बसविण्यासाठी अंदाजे 12 इंच रूंदीचे 15 इंच जाडीचे आणि तब्बल अर्धा कि.मी.लांबीचे काँक्रीटचे बीम आडवे बांधण्यात येऊन बॉक्सकटींगवर या बीमचे ओझं टाकलं आहे. यामुळे सिमेंट फोमिंगमधून कोठेही लालमातीचे ढिगारे कोसळल्यास वरील बीमही निसटून अंडरपासच्या खंदकातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोसळून महामार्ग आणि सर्व्हिसरोड या दोन्ही मार्गांवरील वाहतूक एकाचवेळी ठप्प होण्याची शक्यता दिसून येत आहे. पोलादपूर शहरातील अंडरपास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अभियांत्रिकी तज्ज्ञांना बॉक्सकटींगच्या सिमेंटफोमवर काँक्रीट बीमचे आव्हान देणारे बांधकाम ठेकेदार एलऍण्डटी कंपनीने केल्याचे साधेसुधे ठेकेदार व बांधकाम व्यावसायिक उघडपणे बोलत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *