सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “अन्नपूर्णा”

दिवेश आठ दिवस त्याच्या काकू कडे राहून आल्या पासून खुप चिडचिडा झाला होता.. त्याच्या मनात सारखा राग धुमसत होता.. प्रत्येक छोट्या गोष्टीत त्याची चिडचिड व्हायची.. त्याच्या वयाची म्हणजे बारा तेरा वर्षांची मुलं वाढत्या वयात एकमेकांचं अनुकरण करत असतात.. असं समजून त्याच्या आई ने – शिल्पा ने – ही गोष्ट सोडून दिली…

काही दिवसांनी शिल्पा दिवेशच्या काकूकडे गेली.. तिथे तिचं लक्ष त्यांच्या घरात काम करणाऱ्या मावशी कडे गेलं.. ती जेवायला सगळ्यांसाठी पोळ्या बनवत होती.. तेवढ्यात तिचा फोन वाजला…
“आत्ता कामावर है ना.. संध्याकाळी यीन तवा बगु..!”
असं म्हणून तिने फोन ठेवला..
ती थोडी वैतागलेली वाटली म्हणून शिल्पाने विचारलं..
“काय ओ मंदा ताई.. काय झालं???”

“काई नाई ओ ताई.. माझ्या पोराचा फोन होता.. साळेत कसली तरी फी मागितलीये…”
मंदाताई पोळ्या लाटता लाटता म्हणाल्या.
“मग? आहेत ना पैसे? की देऊ?”

“नको ओ ताई…! ह्याचं रोजचंच आहे..! सारखी डोक्याला कटकट कटकट करतात.. एक तो नवरा तसा… दिसभर पिऊन कुठे तरी पडलेला असतो…! आणि ह्या पोराला एक चैन पडत नाई.. साळा सिकायची…! आवं… निसती कटकट ओ माझ्या मागे..! सारखं ह्यांना काई ना काई हवंच असतं… एकीकडे न्हवरा… त्याला पेयला पैसे पायजेल.. आणि एक पोरगं… कदी वही पायजेल, कदी पेन पायजेल.. कदी फी पायजेल… सारखं चालूच असतं..!”

पोळ्या लाटता लाटता मंदाताई चिडचिड करून सांगत होत्या…

आणि अचानक शिल्पाच्या लक्षात आलं… तिच्या आईनी शिकवलेली एक गोष्ट तिला आठवली..
” जेवण बनवताना बनवणाऱ्याच्या भावना जेवणात उतरतात.. आणि खाणाऱ्याच्या मनात बसतात…! म्हणून तर म्हणतात ना, नवऱ्याच्या मनात घर करायचा रस्ता त्याच्या पोटातून जातो..!”

अचानक मंदाताईची परिस्थिती मुळे होणारी चिडचिड… आणि दिवेशची प्रत्येक गोष्टीत होणारी चिडचिड.. सारखीच वाटू लागली…!

“मंदाताई, तुमच्या मुलाच्या शिक्षणाचं मी बघते… पण तुम्हाला एक अट मान्य करावी लागेल… “शिल्पा म्हणाली..

“अट? कोणती अट??”

“तुम्हाला जेवण बनवताना हे सगळे टेंशन दूर ठेवावे लागतील..अज्जिबात चिडचिड करायची नाही… तुम्ही जेवण जितकं प्रेमानी बनवाल तितकं रुचकर होईल.. आहे का अट मान्य??”

“आवो ताई.. माझ्या पोराचं टेंशन तुम्ही घेत असाल, तर माला कसलं टेंसन..! नवऱ्याचं तर म्या काई करू सकत नाई… पोराचं चांगलं झालं तर परिस्थिति बदलंल..! मान्य हाय मला अट!”
मंदाताई आनंदाने म्हणाल्या..

आता शिल्पाच्याही मनातलं ओझं हलकं झालं..

कित्येकदा आपलंही असंच होतं.. एखाद्या गोष्टीचा राग मनात धरून आपण जेवण बनवतो.. भांडी आपटतो… किंवा बऱ्याच दिवसांनी बायका बायका भेटल्या तर जेवण बनवताना इकडचे तिकडचे विषय निघतात.. त्यावर चर्चा करतो.. ज्याला लोक गॉसिप करणं म्हणतात… आणि बायका गप्पा मारणं म्हणतात..! त्या सगळ्या भावना त्या जेवणात आणि जीवनात उतरतात..
म्हणून शक्यतो जेवण बनवताना त्यात खुप सारा आनंद आणि प्रेम टाकणं गरजेचे आहे..

जिच्या हातचं खाऊन पोट तर भरतंच, पण मन ही प्रफुल्लित राहतं… जी फक्त जिभेवर नाही, तर आयुष्यात चव आणते…तिच खरी अन्नपूर्णा..!!!

-के. एस. अनु