“एक तर तू तिला तुझ्या कडे घेऊन जा.. नाही तर मी तिला वृद्धाश्रमात टाकेन..!”
सोहमने त्याच्या बहिणीला साक्षीला सांगितले.
साक्षीही अडचणीत आली.. सासरच्या परिस्थिती मुळे ती आईची जबाबदारी उचलु शकत नव्हती.. छोटं घर.. जास्त माणसं.. एकत्र कुटुंब.. जेमतेम पैशात चाललेला संसार.. तिला आईची जबाबदारी उचलणं शक्य नव्हतं..
आणि आईचा लाडका मुलगा तिला वृद्धाश्रमात सोडायला निघाला होता..
कारण… त्याच्या बायकोला त्याच्या आईची अडचण होत होती. घरातल्या एखाद्या जुन्या फर्नीचरला जसं टाकून देतात.. तसं ते आईला टाकायला निघाले होते.
सोहमच्या बायकोला त्रास एवढाच होता.. की सोहम ची आई किचन मध्ये तिला मदत करायला जायची.. सोहमला काय आवडतं.. कसं आवडतं.. हे सांगायची.
मग “आयुष्यभर आईच्याच हातचं जेवणार का तो??? त्याला माझ्या हातच्या जेवणाची सवय कधी लागणार??” असा विचार करून तिने सोहमला आई त्रास देते.. आणि तिच्या सोबत नाही राहायचं असं सांगायला सुरुवात केली..
झालं..! मुलाच्या मनात आई बद्दल चिड निर्माण झाली. आणि आज तिला घराबाहेर कढायची त्याची हिंमत झाली..!
आत्ता पर्यंत आई समजली होती… की ती दोन्ही मुलांकडे नाही राहु शकत. आईने वृद्धाश्रमात जाते सांगितलं. आणि घराबाहेर पडली.
बाहेर पडल्यावर तिने स्वतः चा बिजनेस सुरु केला. पैसे कमावले. आई कडे पैसे आल्यावर मुलाला आणि सुनेला तिला घरी आणावंसं वाटलं.
पण आई घरी गेली नाही. तिने तिचा स्वाभिमान जपला. आज पैसा आहे म्हणून तिला किंमत आहे.. पैसा नसताना किती त्रास सहन केला ते फक्त आईलाच माहीत होतं.
आईच्या बिजनेसचा जम बसला. आणि त्यातच तिच्या हाता खाली काम करणारा अनाथ मुलगा तिला आई मानू लागला. हळू हळू दोघांमधे एक घट्ट नातं तयार झालं. त्याला आईची गरज होती. आणि आईला नकळत एक मुलगा मिळाला होता.
आणि तिकडे सोहम बायकोचा स्वभाव समजल्याने आता त्याच्या आई साठी तरसत होता..!
– के. एस. अनु