सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “उपकार”

“आज खुप वाईट वाटलं मला..! तो उपकार करत होता.. आणि मी मैत्री समजलो होतो. आज त्यानी सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या..! आता परत कधी कोणा कडून मदतीची अपेक्षापण नाही करणार..!”
दुःखी झालेला प्रदीप त्याच्या बायकोला साक्षीला सांगत होता.

एका छोट्याशा गोष्टी वरुन प्रदीप आणि सोहम मध्ये वाद झाला. आणि भांडण एवढं वाढलं की बोलता बोलता सोहम मैत्रीत केलेले सगळे उपकार ऐकवायला लागला. त्याने एवढ्या वर्षांच्या मैत्रीत मित्र म्हणून जी मदत केली.. उदास असताना प्रदीपला सांभाळलं.. साक्षी आणि प्रदीपच्या लग्नात त्याच्या घरच्यांना कसं कन्विंस केलं.. लग्नात किती धावपळ केली.. प्रदीपच्या मुलाच्या जन्माच्या वेळी प्रदीप कामासाठी दुसऱ्या शहरात गेला होता.. तेव्हा जवळचा हक्काचा मित्र म्हणून त्याने साक्षीला हॉस्पिटल मध्ये नेलं.. डिलीवरी साठी थांबला.. प्रदीपच्या आधी सोहमने बाळाला जवळ घेतलं.. ही गोष्ट तेव्हा प्रेमाची होती.. आणि भांडणात ही गोष्ट मांडताना प्रदीप कसा केअर लेस आहे.. हे सोहमने जाणवून दिलं.

खरं तर वाद फक्त एका बिजनेस प्रोपोजल वरुन सुरु झाला.. सोहम आणि प्रदीप बिजनेस पार्टनर्सही होते. पण वाद असा वाढत गेला.. की सोहम रागाच्या भरात पर्सनल गोष्टी बोलून बसला..! जे तेव्हा त्याने प्रेमाने, आपुलकीने केलं होतं.. आता त्याने ते बोलून दाखवल्या मुळे त्यातलं प्रेम, माया, आपुलकी.. सगळं मातीत मिळालं. वरुन नातं खराब झालं.. प्रदीप हर्ट झाला.. आणि लोकांवर विश्वास ठेवण्याची हिंमत गमावून बसला!

पूर्वीच्या काळी मोठे लोक म्हणायचे.. कधी ही कोणावर केलेले उपकार बोलून दाखवू नये. त्याने आपण छोटे होतो..

आजकाल आपण ही अशी चुक सर्रास करून बसतो.. कधी कधी ज्याच्यावर उपकार केले.. किंवा प्रेमापोटी ज्याला मदत केली.. तो सोडून बाकी सगळ्यांना आपण किती मदत करतो हे दाखवण्या साठी.. किंवा कधी कधी बढाई मारण्या साठी.. अगदीच काही नाही.. तर गॉसिप म्हणून आपण कसे कधी कोणावर उपकार केले.. याचा पाढा वाचतो..
पण तेव्हा आपण हे विसरतो.. की कधी ना कधी आपल्याला ही कोणाची तरी मदत लागेल.. आणि जेव्हा तो हे उपकार बोलून दाखवेल.. तेव्हा आपण आतून फार तुटू..!
म्हणून वेळीच स्वतः ला आवर घालून कधी कोणाला मदत केलीच.. तर ती गोष्ट फक्त तुमच्या आणि त्याच्या मध्ये राहु द्या.. आणि बघा.. काही दिवसांनी.. काही महिन्यांनी.. काही वर्षांनी.. तोच सर्वांना तुमचे गुणगान सांगेल.
आपलं कौतुक जेव्हा दूसरे करतात.. तोच खरा आनंद असतो.. तेच खरं समाधन असतं.
आपणच आपली तारीफ करण्यात आपण आणखी लहान होत जातो. म्हणून कधी ही केलेल्या मदतीचा उल्लेख पुन्हा करू नये. त्याने नाती आणि मनं स्वच्छ राहतात.

  • के. एस. अनु