त्या दिवसा पासून संदीपने कुमारशी बोलणं कमी केलं होतं.. जेव्हा कुमारचा व्यावहार संदीप सोबत बदलला होता.
राहुन राहुन एकच गोष्ट संदीपच्या मनाला टोचत होती..
“मी तुमच्या उपयोगी पडलो नाही.. तर मी काहीच कामाचा नाही का??? आधीची सारी मैत्री, सगळं गोड बोलणं फक्त मतलबासाठी होतं का?? आणि मी तुमच्या गरजेच्या वेळी मदतीला आलो.. पण तुमच्या अपेक्षा पूर्ण करायला असमर्थ ठरलो.. तर मी पूर्णपणे नालायक ठरलो का?? एका गोष्टीत कमी पडलो.. म्हणून माझ्या इतर चांगल्या गोष्टी तुमच्या नजरेत व्यर्थ ठरल्या का??? तुमच्या एका अपेक्षेत मी थोडासा कमी पडलो.. म्हणून तुम्ही माझ्याशी बोलणं बंद करता??? एवढा स्वार्थ??? मग असंच असेल तर अशी स्वार्थाची मैत्री मला ही नको..!”
संदीपने असं मनात कितीही ठरवलं, तरी ती गोष्ट त्याच्या मनाला खुप लागली होती.. आणि तो कुमारचं तोंडही पाहायला त्याला आवडत नव्हतं.. पण दोघांची फॅमिली एकमेकांशी खुप क्लोज असल्याने त्यांची नेहमी गाठभेट व्हायची.. आणि प्रत्येकवेळी कुमारचं वागणं संदीपला आठवायचं.. मग तो सगळ्यांसमोर तोंड देखलं बोलायचा.. आणि दुसरीकडे निघुन जायचा…
साहजिकच कुमारला त्याच्या ह्या वागण्याने काहीच फरक पडत नव्हता.. कारण कुमारच्या नजरेत संदीप आता बिनकामी होता.. संदीप कडून त्याला काहीच फायदा होणार नव्हता.. म्हणून दोघे ही एकमेकांपासुन दुरच असायचे. आणि त्यांना त्याचं काही वाईट ही वाटत नव्हतं.
आपल्या बाबतीत ही कधी तरी असं होतं.. ऑफिस मधल्या एखाद्या व्यक्ति सोबत.. किंवा नातेवाईकां पैकी कोणा सोबत आपला असा मतभेद होतो. आणि मग त्या व्यक्तीला पाहुन आपला मुड ऑफ होतो..!
मग आपण आपल्याच योग्यतेवर संशय घेऊ लागतो..
“त्याला माझी वॅल्यु नाही.. म्हणजे माझी खरंच पात्रता नाही का? मी खरंच काही कामाचा नाही का??”
अशा तऱ्हेचे प्रश्न मनाला सतावु लागतात.. मग हळूहळू आपण डिप्रेशन मधे जायला लागतो.. आणि काही दिवसांनी आपल्यात असलेले इतर उत्कृष्ट गुण आपण स्वतः च विसरून जातो..!
त्यामुळे अशा घटना, अशी माणसं मनातून, डोक्यातुन आणि आयुष्यतुन काढून टाकायची.. आणि जर कधी त्या व्यक्तीच्या समोर येण्याचा योग येतच असेल.. तर स्वतः मध्ये काय बेस्ट आहे.. आपण कशात निपुण आहोत हे स्वतः ला सांगत राहायचं. म्हणजे नैराश्य यायला जागाच उरणार नाही आयुष्यात..! आणि ह्या पद्धतीने आपण आपल्या कामात, आपल्या कलेत बेस्ट आहोत हे सगळेच मान्य करायला लागतील. आणि आयुष्यात नवे रंग येतील.
– के. एस. अनु