सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “गेम्स”

“काका… तुम्हाला माहितीये…. मी आज पाच हज्जार मीटर पळले…!”
छोटी चिऊ तिच्या लाडक्या काकाला सांगत होती…

“पाच हजार मीटर!!! बापरे!!! कुठे पळत होतीस एवढी???”

“टेम्पल रन मधे काका!!”

आणि इथे काकानी कपाळावर हात मारला!

तिकडे सुमन ताईंकडे वेगळीच परिस्थिती…!
एकत्र कुटुंब.. सुट्टीचा दिवस.. सगळे पुरुष मंडळी बसून काही चर्चा करतायत.. गप्पा मारतायत… तिकडे बायका किचन मध्ये काही भाज्या निवड, जेवण बनव.. अशी कामं करतायत.. काम करता करता गप्पा चालू आहेत…
घरातल्या मुली कोणी पिक्चर बघ, कोणी पुस्तक वाच.. असं सगळं चालू आहे… आणि अचानक…

“ए sss… पकड पकड पकड… मार त्याला… अरे मार लवकर… नाहीतर तो मला मारेल…!”
“तो बघ तो बघ… तिकडे… तुझ्या मागे एक आहे…! मार मार…!”

हे असं बोलणं ऐकून सगळ्यांची नजर सर्वेश कडे वळली..
मग कळलं… तो पब जी खेळतोय!!!

आजकालच्या मुलांचे गेम्स बऱ्याचदा त्यांच्या पेरेंट्सना समजतच नाहीत..!
“काय होणार आहे हे खेळुन?? त्यापेक्षा जरा अभ्यास करा, पुस्तकं वाचा… बाहेरचे मैदानी खेळ खेळा..!” असं सर्रास मुलांना ऐकवलं जातं…

वास्तविक त्याचं बरोबरही असतं.. मैदानी खेळाने शरीर आणि बुद्धि तंदुरुस्त राहते.. टीम बनवून खेळायचे खेळ असतील तर त्यातून सहकार्याने काम करायची सवय निर्माण होते…

सद्ध्या पब जी सारखे खेळ खेळताना मुलांमध्ये अशी एकत्र खेळायची, एकमेकांची मदत करायची वृत्ती नक्कीच वाढते आहे.
पण ह्याचा एक परिणाम असा ही होतो.. की शत्रुला मारायची विचारधारा निर्माण होते.. जर मुलांना भारताच्या सेनेत भरती व्हायचं असेल.. तर नक्कीच ह्याचा फायदा होऊ शकतो… पण नुसती विचारशक्ति असून काय होणार? शारिरीक क्षमता ही तेवढीच महत्वाची..!
आणि ती शारिरीक क्षमता निर्माण करायला व्यायाम, मैदानी खेळ आणि पोषक आहार फार महत्वाचा…

त्यामुळे घरात असे मोबाईल गेम्स खेळणाऱ्या मुलांना मैदानी खेळही खेळायला लावणं हे पालकांचं कर्तव्य आहे..
काही आई वडील एकुलतं एक मूल आहे, खेळायला कोणी नाही… मोबाईल दिला की जरा वेळ तरी शांतता मिळते.. वगैरे विचार करून मुलांना लहानपणीच मोबाईलची सवय लावतात.. आणि नंतर “आमचा मुलगा सारखा फोन घेतो!” म्हणून तक्रार करत राहतात…
म्हणून आपण सुरूवातीपासूनच काही नियम घालून दिले तर ही तक्रार करायची वेळच येत नाही…!

त्यात सद्ध्या कोरोना च्या वाढत्या संक्रमणा मुळे आणि लॉकडाऊन मुळे शाळा ही ऑनलाइन म्हणजे मोबाईल वर भरायला लागली आहे.. त्यामुळे मुलांच्या हातात जास्त वेळ फोन राहतो..
म्हणून आता पालकांची जबाबदारी वाढली आहे.
मुलं नक्की अभ्यासा साठी फोन वापरतात, की गेम्स खेळायला.. हे नक्कीच पाहायला हवं..

जर पुढची पीढी शरीर आणि मनाने तंदुरुस्त असेल.. तरच त्यांना आयुष्याचा खरा आनंद उपभोगता येईल.. अन्यथा सारेच व्यर्थ होईल..!
त्यामुळे मुलांना मैदानी खेळ, जिम, ट्रेकिंग या साऱ्या साठी नेहमी प्रोत्साहन द्यायचा निर्णय घेऊन त्यावर अंमल करूया..
तर च आपल्या देशाची पुढची पीढी देश अजुन प्रगत बनवू शकेल.

– के. एस. अनु