“ती सोसायटी मधली स्वीटी पाहिली का??? कसे कपडे घालते ना..!”
“हो ना.. लाजा कशा वाटत नाहीत छोटे छोटे कपडे घालायला…!”
“ह्म्म्म… मॉडेलिंग करते म्हणे..!”
“कसलं काय मॉडेलिंग… रात्री अपरात्री पार्ट्या करायला जाते..! म्हणून तर आई बापा बरोबर नाही रहात!”
“ही रहात नाही की त्यांनी काढलं घराबाहेर कोणास ठावुक!”
तासभर त्या स्वीटीच्या सगळ्या खानदाना बद्दल बोलून झाल्यावर..
“मरु दे बाई.. आपल्याला काय करायचंय..!”
असं म्हणत देवकीच्या घरुन शांता काकू दुसऱ्या मैत्रीणी कडे विचारांची देवाण घेवाण करायला निघाल्या..!
“बरं झालं गेली ही बाई…! हिला काय करायच्यात लोकांच्या चौकशा..!”
देवकीची कॉलेजला जाणारी मुलगी म्हणाली.
आणि मग शांता काकू किती वायफळ बडबडते… ह्यावर माय लेकीची तासभर चर्चा झाली..!
आजकालच्या जगात काही माणसे अशी असतात.. की त्यांना लोकांच्या पर्सनल लाईफ मध्ये खुप इंटरेस्ट असतो. आणि त्यांच्या नजरेत ‘मी एकदम परफेक्ट..! आणि बाकीचे वाईट..!’ असंच असतं.
पुरुष ही गॉसिप करण्यात मागे नसतात.. त्यांना ही असे विषय एखाद्या घटनेतून मिळतात..
म्हणजे जर झाडावरुन एक कैरी खाली पडली.. तर लोकांपर्यंत पोहोचताना कलिंगड हातातून खाली पडून फुटून त्याचा गर बाहेर येऊन कोणावर तरी उडालेला असतो..! आणि मग तो कलिंगड नीट न पकडणारा सगळ्यांच्या नजरेत गुन्हेगार होतो..! पण वास्तविक झाडावरुन कैरी पडलेली असते..! म्हणजे ज्याच्या बद्दल ह्या अफवा किंवा गॉसिप पसरवले जातात.. वास्तविक त्याला काही माहीतच नसतं..! कारण सत्यात ते घडलेलंच नसतं..!
स्वीटीच्या बाबतीत ही असंच असु शकतं..! ती पार्टी करण्यासाठी नाही.. तर कामासाठी बाहेर गेलेली असु शकते..! पण गॉसिप करता करता एकदा घडलेली गोष्ट दहा वेळा घडली अशा पद्धतीने पसरवलं जातं.
खरं तर सत्य कोणालाच माहीत नसतं.. केवळ त्या व्यक्तीला माहीत असतं जिच्या बद्दल बोललं जातं..
मग लोकं एखाद्या बद्दल का बोलतात???
कारण ती त्यांची मानसिक गरज असते.. आम्ही तुमच्या सारखे आहोत.. आपण सेम आहोत.. हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो..!
एखाद्या बद्दल गॉसिप केलं जातं.. कारण तो वाईट आहे.. असं सगळ्यांना वाटतं…पण वास्तविक.. फॅक्ट हा असतो.. की ती व्यक्ति वाईट नसते… फक्त सगळ्यांपेक्षा वेगळी असते..!
वाईट कोणीच नसतं.. फक्त ते आपल्या सारखं नसतं..!
ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली.. तर आपला जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदलेल.. आणि स्वतः ला इतरांसारखं प्रूव करायची बऱ्याच जणांची धडपड संपेल. मग कोणा बद्दल ही गॉसिप न होता.. त्याच्या चांगल्या गुणांची चर्चा होईल. आणि प्रत्येक जण पॉजिटिव होईल. कोणीच लोकांचं गॉसिप ऐकून स्वतः ला वाईट किंवा चुकिचं समजणार नाही…
आणि मेंटली व इमोशनली एक सुदृढ समाज तयार होईल.
– के. एस. अनु