सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “चालतं फिरतं वर्तमानपत्र”

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक तरी वर्तमान पत्र असतं.. जे फक्त दुसऱ्यांच्या बातम्या पुरवायला घरी येतं..!
म्हणजे कोणाच्या घरात काय घडलं.. कोणाच्या मुलींचं लग्न झालं.. कोणाची मुलगी पळून गेली.. कोणाच्या घरात भांडणं झाली.. कोणत्या विषया वरुन झाली… ह्या आणि अशा प्रकारच्या बातम्या पुरवणारं चालतं फिरतं वर्तमान पत्र..!
मग ते कधी शेजाऱ्याच्या रुपात.. कधी नातेवाईकांच्या रुपात.. तर कधी ओळखीच्या कोणाच्या रुपात आपल्या आयुष्यात प्रवेश करतं…

अशी माणसं जे सांगतात ते किती खरं असतं हा प्रश्न तर दुय्यमच असतो.. पण जे सांगतात ते खरं आहे की नाही.. हे समजून घेणं जास्त गरजेचं असतं.
काही ठिकाणी ऐकू आलेली बातमी.. कधी कळवळा म्हणून, कधी उत्सुकता म्हणून.. तर कधी अगदीच समोरच्याला माहीत आहे की नाही हे पाहण्यासाठी पसरवली जाते..!
अंकिताच्या बाबतीत असंच झालं.. अंकिता आणि दिपकचा छोटासा संसार.. दिपकचे आई वडील गावाला.. आणि एक दिवस जेवण वगैरे झाल्यावर दारावरची बेल वाजली.. दार उघडून पाहते तर दिपकची आई आणि शेजारच्या शामला मावशी दारात उभ्या! अंकिताने त्यांना आत घेतलं.. गप्पा झाल्या.. अंकिता म्हणाली.. “आत्ताच आमचं जेवण झालं.. तुम्ही येताय माहीत असतं तर आम्ही थांबलो असतो जेवायचे..!”
“आता वाढ मला.. मी बसते जेवायला..” दिपकची आई म्हणाली..

“हो…मी काही तरी बनवते पटकन.. तुम्ही बसा मावशी सोबत गप्पा मारत.. मी पाच दहा मिनिटांत वाढते..”

आणि ही बातमी पसरत पसरत अशी पसरली.. की .. अंकिताने सासु येणार माहीत असून ही तिच्या साठी जेवण बनवलं नाही..! एवढंच नाही.. ती सासुचा छळ पण करते.. आणि म्हणून तिने वेगळा संसार थाटला..!
अशा अनेक बातम्या हळू हळू अंकिता आणि दिपकच्या कानावर येऊ लागल्या..
वास्तविक दीपक त्या दिवशी, त्या क्षणी घरी होता.. त्याच्या समोर सारा प्रकार घडला होता.. त्यामुळे त्याचा अंकिता वर विश्वास होता.. आणि तिचा स्वभाव त्याला माहीत होता.. आणि वास्तविक त्याची आई न कळवता आली होती..हे सारे त्याला माहीत असल्या मुळे तो अंकिताच्या पाठीशी खंबिरपणे उभा होता..

पण जर दीपक घटना घडली तेव्हा तिथे नसता तर???
त्याला अंकितावर विश्वास नसता तर???
ह्या चालत्या फिरत्या वर्तमान पत्रांमुळे दिपक आणि अंकिताचा संसार उध्वस्त झाला असता.. अंकिता मानसिक रित्या खचली असती..

असे किती तरी अंकिता आणि दिपक आपल्या आजुबाजुला असतील.. ज्यांच्या आयुष्यात ह्या चालत्या फिरत्या वर्तमान पत्रां मुळे अनेकदा गैरसमज होत असेल…
अनेकदा आपण ही ह्याचा एक भाग होऊन जातो.. आणि आपल्याला समजतही नाही..!
त्यामुळे फक्त ऐकून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा जर एखादी घटना आपल्या नजरे समोर घडली.. तरच त्यावर विश्वास ठेवावा..
आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपण फिरणाऱ्या वर्तमान पत्राचा भाग होऊ नये.. ज्यांच्या आयुष्यात काही घडत असतं.. ते ऑलरेडी भोगत असतात.. सहन करत असतात.. त्यामुळे किमान आपल्या मुळे तरी कोणाला त्रास होऊ नये ह्याची काळजी आपण घ्यायला हवी.

आणि जी वर्तमान पत्र आपल्या घरात येऊन.. आपल्यासमोर दुसऱ्यांबद्दल बोलत असतात.. तीच वर्तमान पत्र.. दुसऱ्यांसमोर आपल्या बद्दल ही बोलत असतात.. हे नेहमी लक्षात ठेवावे.

– के. एस. अनु