सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “जेवण”

“काहीही म्हणा.. पण आमच्या वहिनीच्या हाताला चव आहे!”
निलेश त्याच्या मित्राला म्हणाला.
आज त्याच्या मित्राकडे- रोहितकडे- आज सगळे जेवायला जमले होते. आणि उत्कृष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन सगळे गप्पा मारायला बसले होते.
रोहितचे जवळचे मित्र त्यांच्या फॅमिली सोबत आले होते. त्यामुळे जेवणाचा खास बेत होता. सगळे मित्र बऱ्याच दिवसांनी भेटल्याच्या आनंदात होते.. रोहितच्या बायकोला – निताला वाटलं, शाळेतले विषय निघतील.. कॉलेजच्या गप्पा होतील.. पण जेवण झाल्या पासून प्रत्येक जण जेवणाचीच तारीफ करत होता.. फक्त पुरुष मंडळीच नव्हे.. तर त्यांच्या बायकाही!
कोणी तिला रेसिपी विचारत होतं.. कोणी प्रेजेंटेशनची तारीफ करत होतं…
निता मनोमन सुखावली होती.
तिच्या आईने सांगितलेलं गुपित तिला अगदी मनापासून पटलं होतं..!
तिची आई नेहमी म्हणायची..
माणुस आधी नजरेने खातो… मग दाताने खातो.. मग जीभेने खातो.. आणि सर्वात शेवटी तो मनाने खातो..!
निताला आधी समजायचं नाही.. पण जेवण बनवायला लागल्यावर तिच्या सारं काही लक्षात आलं.
जेवण नजरेने खातो.. म्हणजे जेव्हा ते समोर येतं.. तेव्हा ते दिसायला सुंदर- आकर्षक असेल.. तर ते खायची इच्छा बळावते. तोंडाला पाणी सुटतं.
दाताने खातो म्हणजे चावतो..
जीभेने त्याचा आस्वाद घेतो..
आणि जेव्हा पोट भरलं तरी माणुस पुन्हा घेतो.. तेव्हा तो मनाने खातो..!
काही जण म्हणतात ना… पेट भर गया..मगर दिल नहीं..
तेच!
त्यामुळे जेवण अगदी रुचकर तर असावंच पण दिसायला ही सुंदर दिसावं. आणि त्याचा सुंगधही तसाच असावा. म्हणजे जेवणारा तृप्त होतो.

आज आईच्या शिकवणीमुळे सगळ्यांकडून तारीफ मिळवताना निताला आईची खुप आठवण आली. आणि आईची ही शिकवण आपल्या मुलीला द्यायचे तिने मनोमन ठरवले..!

– के. एस. अनु