सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “दृष्टिकोन”

“ए.. हे असे कपडे घालून कुठे चाललीस?”
मोहन त्याच्या वयात आलेल्या लहान बहिणीवर डाफरला.

“पण दादा… स्लीवलेस टॉपच तर आहे फक्त.. बाकी जीन्स तर अंगभर आहे ना..!”
ओजस्वी घेतलेल्या कपडयांचं समर्थन करत म्हणाली..

“ते मला काही माहीत नाही… पूर्ण अंगभर कपडे घालून बाहेर जा. आणि सातच्या आत घरी यायचं.. समजलं?”

“पण आज माझ्या फ्रेंड ची बर्थडे पार्टी आहे.. रात्री तिच्याकडे जेवूनच येणार आहे. आईला सांगितलंय..”

“ते मला माहीत नाही.. सातच्या आत घरात आली पाहिजेस..!” मोहनने ओजस्वीला ठणकावून सांगितलं.

‘बरं’ म्हणून ओजस्वी गेली..
आणि आई किचन मधुन बाहेर आली…
“का रे एवढी आडकाठी करतोस तिला..?”

“अगं आई, तुला कळत नाही.. आजकाल दिवस चांगले नाहीत.. उगाच डोक्याला ताप नको..!”

“डोक्याला ताप म्हणजे रे? म्हणायचंय काय तुला?”

“काही नाही… सोड…!” मोहन विषय टाळू लागला..

“का? सांग ना… कोणी तिच्या मागे लागेल.. तिला छेडेल.. असं वाटतं का तुला??”

“अगं काय तू पण..! सोड ना आता विषय..!”

“का सोडू??? तुझ्या अशा वागण्यानी माझ्या मुलीला सतत बंधनात राहवं लागतं… ”

“बंधनात राहीली तर भविष्यात दुःख भोगावं लागणार नाही…!”
मोहन रागात म्हणाला..

“दुःख…! कसलं दुःख???? अच्छा… म्हणजे जसं त्या निर्भया बरोबर घडलं तसं का?”

“हो! हिला आत्ताच बंधनात ठेवलं तर कोणी तिच्यावर वाईट नजर नाही टाकू शकणार…!”

“असं तुला वाटतं..!!! तिला बंधनात ठेवतोस.. अंगभर कपडे घालायला लावतोस.. स्लीवलेस सुद्धा घालु देत नाहीस… तुला काय वाटतं… साडी नेसणाऱ्या बायकांवर बलात्कार होत नाहीत???? लहान मुलींवर बलात्कार झाले नाहीत???? तान्ह्या बाळावर ही लोक… वाईट नजर ठेवतात..!” हे बोलताना आईलाच लाज वाटत होती.

“अगं होत असतील.. पण आपल्या घरातल्या मुलीवर नाही झालं पाहिजे असं काही…!”

“म्हणूनच मी आज तुझ्याशी हे बोलतेय..! जगाला, मुलींना बदलण्या आधी ना.. स्वतः ला बदला… स्वतः चे विचार बदला.. स्वतः ची वाईट नजर कोणत्याच मुलीवर ठेवू नका.. तर कोणत्याही मुलीसोबत असं दुष्कृत्य होणार नाही.. समजलास??”

” अगं मी माझी नजर लाख बदलेन.. पण सगळ्यांच्या घरात आपल्या सारखी शिकवण मिळत नाही..! फक्त मी बदलून बाकीची मुलं बदलणार नाहीत..! म्हणून मी ओजस्वीला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतो.. ” मोहन म्हणाला.

दोघांचं ही बरोबर होतं.. आईच्या म्हणण्या प्रमाणे.. फक्त मुलींनी स्वतः ला आळा घालून हा विषय संपणार नाही.. ज्यांची नजर वाईट पडते, त्या नजरेला, त्या दृष्टिकोनाला बदलायची गरज आहे…

आणि मोहन च्या म्हणण्या प्रमाणे.. फक्त एका स्तरावर बदल घडून उपयोग नाही.. समाजाच्या प्रत्येक स्तरावर हा बदल, मुलींकडे बघायची नजर बदलणं आवश्यक आहे.. पुरुषांना- मुलांना हे समजावणं गरजेचं आहे.. की मूली ह्या एखादी वस्तु नव्हेत.. जिला हवं तसं वापरता येईल… तिलाही जीव आहे.. मन आहे…
कोणी प्रपोज केलं.. आणि ती नाही म्हणाली.. तर त्यात पुरुषार्थ दुखावण्या सारखं काहीच नाही..! कोणी भर रस्त्यात तिला छेडलं.. तर तिचा आवाज आणि हात स्वतः साठी उठायलाच हवा.. आणि त्या सोबतच आजुबाजुला उभं राहून नसतं बघत राहण्या ऐवजी अनेकांनी तिला मदतही करायला हवी.. म्हणजे कोणत्याच मुलाची, पुरुषाची वाकडं वागायची हिंमत होणार नाही.. आणि हा समाज आपोआप बदलेल…

आपण बलात्कार होऊ नये म्हणून मुलींना बंधन घालायला शिकलो..
पण बलात्कार करू नकोस हे मुलांना शिकवायला कधी शिकणार???

– के. एस. अनु