सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “नावडती भाजी”

“वांग्याची भाजी!!! छी..! मला नको…! मी नाही जेवणार..!”
आर्यनने आईला सांगून टाकलं. आणि वाढलेल्या पानावरुन उठु लागला.

“बघ.. विचार कर.. जे आहे तेच खायचंय. नंतर भुक लागली तरी हेच मिळणार.!”
आईने ठणकावून सांगितलं.
शेवटी ती आर्यनची आई होती..!
दोघे हट्टी..!
आर्यन म्हणाला “नकोय वांगं..!”
आई म्हणाली.. “बघते कसा खात नाहीस..!”

भुक लागलेली असताना ही आर्यन जेवला नाही. आईने ही दूसरी भाजी बनवून दिली नाही!
आर्यनची आजी हे सर्व पाहत होती.
“अगं शामल, दे कि करून एखादी दूसरी भाजी.. घरात कशाची कमी आहे! केल्या दोन भाज्या तर काय फरक पडणार? पोरगं उपाशी राहील उगाच..!” अजी म्हणाली.

“अहो आई, मी त्याची आई आहे. त्याची काळजी मला ही आहे. पण पोटात सगळ्या भाज्या जायला हव्या. आणि आज मी करून देईन दूसरी भाजी.. पण मग तो असा सारखाच अन्नाचा अपमान करेल. उद्या तुम्ही नसाल, मी नसेन.. तेव्हा कोण देणार ह्याला ह्याच्या आवडीचं सगळं?”

“अगं, पण तो आत्ता लहान आहे..! त्याला नसतील समजत ह्या गोष्टी..”

“त्या समजाव्या म्हणून तर आज अशी वागते आहे. उद्या लोकाच्या घरी कुठे जेवायला गेलो.. किंवा घरी पाहुणे आले..आणि नेमकी ह्याची नावडती भाजी असली.. तर तेव्हा सगळ्यांसमोर जेवण सोडून उठेल हा. तेव्हा सगळे समोर गोड हसतील.. पण मागे नावंच ठेवतील..! आईने लाडावून ठेवलं म्हणतील. तेव्हा काय करणार..? आणि ती वेळ येऊ नये.. म्हणून आज मी अशी वागतेय.”

आर्यनच्या आईचं म्हणणं आजीला पटलं.. आणि दारामागुन लपुन ऐकत असलेल्या आर्यनला सुद्धा..!

आईचं लक्ष नसताना तो येऊन पानावर बसला.. आणि वांग्याची भाजी खाऊ लागला. आईला ते पाहुन खुप समाधन वाटलं. म्हणाली..
“रात्री तुझ्या आवडीची भाजी करूया हं..”

“आई, कोणती ही भाजी कर.. मी खाईन!”

हे ऐकून आईला आर्यन अचानक मोठा वाटू लागला.

कधी कधी मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतील.. तर प्रसंगी थोडं कठोर व्हावं लागतं. कारण मुलं मोठी झाल्यावर चुकली.. तर लोकं हेच म्हणतात.. “तुझ्या आईनी काही शिकवलं नाही का???”
त्यामुळे प्रसंगी आई कठोर झाली तरी ते मुलांच्या हिताचंच असतं..आणि हे सर्वात आधी आईने आणि घरातल्या मोठ्यांनी समजून घ्यायला हवं.

  • के. एस. अनु