सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “प्रेम”

“हे वय नाहीये तुझं प्रेम बीम करायचं..! गप्प अभ्यासावर लक्ष दे.. नाहीतर सरळ घरात डांबुन ठेवेन..!”
आईच्या अशा कडक शब्दांमुळे तेरा वर्षांची पुनम खुप रडू लागली.

आत्ताच तर तिला शाळेतला एक मुलगा आवडू लागला होता. त्याचं वागणं, त्याचं बोलणं तिच्या मनात घर करून बसलं होतं. तो तिला जी खास ट्रीटमेंट द्यायचा.. तिला खुप स्पेशल वाटायचं..! आणि नेमकं ह्या मुळेच तिला तो आवडायचा.
त्याच्या शिवाय पुनमला करमेनासं झालं. सतत डोक्यात त्याचा विचार.. त्याच्या आठवणी.. ‘आज तो दिसला तेव्हा मनात कसा काहुर माजला.. त्याच्या नुसतं बघण्याने पोटात फुलपाखरं कशी उडु लागली… उद्या तो भेटेल तेव्हा कोणत्या बहाण्याने त्याच्याशी बोलावं.. ‘
हे आणि असे अनेक विचार तिच्या मनात फिरू लागले..
तिचं अभ्यासात लक्ष लागेना.
त्याच्या शिवाय दुसरं काही दिसेना.
एकदा त्याला रात्री बेडरूम मध्ये लपुन तिने कॉल सुद्धा केला!
आणि तेव्हा पासून रात्री लवकर जेवून झोपायला बेडरूम मध्ये जायची. पण झोपायची मात्र रात्री एक एक दोन दोन वाजता..! वॉट्सप वर रात्रभर ह्याचं चॅटींग व्हायचं. मग एकमेकांमध्ये गुंतणं सुरु झालं…
तो म्हणेल ती च पूर्व दिशा..!
तिचं घरच्यांशी वागणं बदललं.. सरळ तोंडाने बोलणं संपलं.. मोबाईल नेहमी लॉक असायचा.. घरच्यांनी बघू नये म्हणुन प्रत्येक ऍपला वेगळं लॉक..!

तिच्या आईला तिच्या वागण्यामुळे संशय येऊ लागला.
आणि एक दिवस जेवण झाल्यावर पूनम जशी बेडरूम मध्ये गेली.. थोड्या वेळात आई तिला पाहायला बेडरूम मध्ये हजर..!
पाहते तर पूनमच्या हातात मोबाईल..!
“कोणाशी बोलतेस?”
विचारल्यावर टाळाटाळीची उत्तरं..!

मग काय.. आईने फोन चेक केला. एवढ्या रात्री मुलाशी बोलतेय पाहिल्यावर आईने सगळी चौकशी केली.. सगळा प्रकार आईच्या लक्षात आला.

सर्व प्रथम आईने तिचा फोन काढून घेतला. आणि त्या मुलाशी न बोलण्याची ताकीद दिली. पण पुनमचे त्याच्या बद्दलचे सो कॉल्ड प्रेम पाहुन आईने सरळ धमकी दिली..!
प्रसंगी तिने दोन फटके द्यायला मागे पुढे पाहिलं नसतं.
पण फक्त समजावून पूनम समजेल असं तिला वाटलं.

काही दिवस लोटले.. पूनम पूर्वी सारखी सरळ होती. सर्वांशी प्रेमाने वागत होती.
आईने एक दिवस सहज फोन चेक केला.. आणि पाहते तर काय…
“त्या”च मुलाशी पूनम अजूनही बोलत होती..!
पण आईला मात्र सांगितले नाही.

आता मात्र आईला राग अनावर झाला. समजावून ही समजत नाही म्हंटल्या वर आईने तिला दोन फटके दिले. आणि बेडरूम मध्ये बंद केले.
“उद्या पोरगी कोणा बरोबर पळून गेली तर??? एखादं चुकिचं पाऊल उचललं तर..?? तिला जे प्रेम वाटतंय.. त्यात तिने काही पुढचा पराक्रम केला तर???”
एक ना अनेक शंकांनी पुनमची आई हैराण झाली होती.
उद्या मुलीच्या चुकिला समाज आईलाच जबाबदार ठरवणार हे तिला पक्कं ठावुक होतं.

म्हणून मुलीच्या भल्या साठी आई ने वेळ प्रसंगी रुद्र रूप धारण केलं होतं.

अनेकदा आपल्या बाबतीत असंच होतं..आपण मुलांचे लाड करतो.. काही वेळा ते इतके जास्त होतात.. की मुलं आई वडिलांची सुद्धा किंमत करीत नाहीत. आणि प्रेम प्रेम म्हणून कोणाच्या तरी मागे लागतात.
अशा प्रसंगी मुलांच्या हिता साठी कठोर व्हावे लागले तरी मनात संकोच नसावा. जमेल त्या मार्गाने वयात येणाऱ्या मुलांना त्यांचे हित सांगावे.
आई वडिलांचा हक्क नेहमी जास्त असतो. म्हणून मुलांनी ही बारा तेरा वर्षांचे होताना किंवा त्या नंतर ही कोणी आवडले तर त्याला प्रेम समजून पुढचे आयुष्य वाया न घालवता प्रेम आणि आकर्षण यातला फरक समजून घ्यावा. म्हणजे पुढचे आयुष्य सुखकर होईल.

– के. एस. अनु