“माधवी..! अशी अचानक??? अशी रात्री अपरात्री कशी आलीस??? आणि रडतेस का???”
मध्यरात्री माधवीला दारात पाहुन माधवीचे आई वडील भांबावले होते. नेमकं काय झालं ते त्यांना कळेना. माधवी ही बोलेना..!
“काय झालं? जावईबापू काही बोलले का??”
आईने काळजीने विचारलं.
“जावई???? कसाई आहे कसाई..!” रागाने लालबुंद झालेली माधवी म्हणाली.
“हे गं काय बोलतेस?? अगं नवरा आहे तो तुझा..! जरा आदरानी बोल!” आई म्हणाली.
“आदर??? असं काय केलंय त्यानी की मला त्याच्या बद्दल आदर वाटावा??”
“का?? असं काय केलं जावईबापुंनी की तुला एवढा राग यावा???”
“काय सांगू आणि कसं सांगू???? मलाच लाज वाटते..!”
“बोल गं पोरी..” माधवीचे बाबा काळजीपोटी म्हणाले.
“कसं सांगू बाबा..! मला असह्य होतंय सगळं.. शेवटी हद्द पार झाली.. म्हणून आले निघुन..!”
“काय झालं ते तर सांग..!”
“बाबा.. आई… नाही सहन होत ओ मला.. ती रोज रोजची भांडणं.. त्याचं दारू पिऊन माझ्या जवळ येणं.. मला कितीही किळस वाटली तरी माझ्यावर जबरदस्ती करणं.. नाही सहन झाला मला… तो रोजचा बलात्कार..!”
“बलात्कार??? अगं नवरा आहे तो तुझा..! त्याने काही केलं तर तो बलात्कार होत नाही..! उलट नशिबवान आहेस की किमान नवरा जवळ तरी येतोय..! ” आई रागाने म्हणाली.
“अगं नवरा आहे म्हणून त्याला माझ्या शरीराशी खेळायचा हक्क मिळाला का???”
“अगं प्रेम असतं ते… नवऱ्याचं बायको वर..! ”
“अगं आई, इच्छा नसताना ही जबरदस्ती करणं प्रेम असतं??? मग एवढं प्रेम उफाळून येतं.. तर दारू का सोडत नाही??? एवढं प्रेम ऊतु जातं तर माझ्या इच्छेचा आदर का केला जात नाही??? एवढं प्रेम असतं तर रोज रोज माझ्यावर जबरदस्ती का होते???? ज्याला समाजात बलात्कार म्हणतात..!”
“चार पुस्तकं जास्त शिकलिस म्हणून आम्हाला अक्कल शिकवु नको..! तो तुझा नवरा आहे. तुझ्या सोबत हवं ते करेल! आम्ही उद्याच तुला त्याच्याकडे सोडून येऊ.. मग त्याने तुला मारून टाकलं तरी चालेल.. पण आमची इज्जत घालवायला माहेरी येऊ नकोस..! पुन्हा तुझं तोंड ही आम्हाला दाखवू नकोस…!
नवऱ्याच्या विरुद्ध जाणारी औलाद जन्माला घातली ह्याचंच दुःख वाटतंय..!”
“अगं आई.. तू एक स्त्री आहेस..! तूच माझ्या भावना समजू शकत नाहीस???”
“चुकीच्या गोष्टींना आमच्याकडे थारा नाही..! सकाळी चालती हो घरातून.. आणि पुन्हा येऊ नकोस आमची इज्जत घालवायला..!”
माधवीच्या आई वडिलांसारखे अनेक जण असतात.. जे मुलगी लग्नानंतर माहेरी राहीली तर इज्जत गेली समजतात.. पण तिच्या मर्जी शिवाय होणाऱ्या मिलनाला बलात्कार मानत नाहीत..!
माधवी सारख्या स्त्रियांना स्वतः साठी उभं राहणं फार गरजेचं आहे. आणि स्वतः साठी उभं राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तिचा मान आणि हक्क मिळायलाच हवा..
पण त्यासाठी आपली मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. जर एखाद्या स्त्रीच्या किंवा मुलीच्या मर्जी शिवाय तिला स्पर्श केला गेला.. तिचा उपभोग घेतला तर तो बलात्कारच मानला जातो.. हे आपण स्वतः ला आणि इतरांना समजावणं महत्वपूर्ण आहे.
समाजातल्या काही स्तरातल्या लोकांना लग्न केलं म्हणजे बायको सोबत हवं ते हवं तेव्हा करायचा लायसंस मिळाला असंच वाटतं.. मग त्यात बायकोची इच्छा असो, नसो..! त्यांना फरक पडत नाही..! त्यांना फक्त उपभोग घेऊन हक्क गाजवायचा असतो.
आणि त्यांना असं वाटत असतं की त्यांना बलात्काराचं लायसंसच मिळालं आहे. कारण ना बायको हे कोणाला सांगू शकत.. ना तिला कोणी सपोर्ट करणार..! मग हे बलात्काराचं गुपित गुप्तच राहील!
आणि असे विचार असणाऱ्या लोकांना आता आपण शिकवणं फार गरजेचं आहे.. आपल्या भीतीने जर त्यांनी त्यांची वागणूक बदलली तर एका स्त्रीचे आयुष्य सोप्पे होईल.
– के. एस. अनु