सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “भावना”

“काय गं प्रीती… का रडतेस??”
सुप्रिया मावशीने प्रीतीला विचारलं.

“माऊ… माझ्या बेस्ट फ्रेंडचा – प्रतीक्षाचा भुभु मेला..!”
रडत रडत छोट्या प्रीतीने मावशीला सांगितलं.

“अगं मग काय झालं? तू तर त्याला भेटली पण नव्हतीस! मग तुला का एवढं वाईट वाटतंय?”

“मला भुभु आवडतात ना… आणि माझ्या बेस्ट फ्रेंडला किती वाईट वाटत असेल… म्हणून मला रडायला येतंय.”

प्रीतीच्या ह्या वाक्यावर सुप्रिया मावशीला हसायला आलं.
“अगं वेडे.. तिला वाईट वाटत असेल म्हणून तू रडतेस!! लोकांना कळलं तर हसतील तुझ्यावर..! चल.. सोड हे रडणं..!”

लोक का हसतील हे प्रीतीला कळेच ना..!
आपल्या कडे लोकंच ठरवतात.. की कोणाला कोणाबद्दल किती वाटलं पाहिजे… किती भावना हव्या..!
म्हणजे जर एखादी मुलगी लग्न करून सासरी गेली.. आणि तिच्या सासरच्या नात्यातलं कोणी दु:खी असेल.. कोणी प्रॉब्लेम मधे असेल.. आणि तिचं आणि त्या व्यक्तीचं नातं खुप छान असेल.. ते भावनिक रित्या जोडले गेले असतील.. तरी अनेकदा लोकं हेच म्हणतात.. “तू तर आत्ता आलीस..! आम्ही आधी पासून आहोत.. म्हणजे आमच्या किती आठवणी असतील.. आमचं नातं किती घट्ट असेल..!”
ह्याचा सरळ शब्दातला अर्थ..” तू आत्ता आलीस.. म्हणून तुला आमच्या पेक्षा जास्त त्या व्यक्ति बद्दल वाटूच शकत नाही.. आणि जरी वाटत असेल.. तरी आमच्या भावना तुझ्या भावनांपेक्षा जास्तच असणार!”

आणि समाजात हेच जास्त घडतं..
एखादी व्यक्ति जगाचा निरोप घेऊन गेली.. तरी ही लोक असेच वागतात.. तेच मनातल्या मनात ठरवतात.. की कोणाला कोणाबद्दल किती आणि कशा भावना हव्या.
म्हणजे जर एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याचे निधन झाले.. तर लोक हेच बघतात.. की ती रडते की नाही.. रडते तर किती रडते..
मग भले तिच्या भावना काहीही असो..! म्हणजे जेवढं जगला, तेवढं आयुष्यभर त्याने तिच्यावर अत्याचार केले असतील.. तिला दारू पिऊन छळलं असेल.. किंवा मारलं असेल… तिला सासुरवास सहन करावा लागला असेल.. आणि तिच्या मनात त्याच्या बद्दल रागा शिवाय आता कोणती भावना उरलीच नसेल.. तरी तिने रडायलाच हवं.. त्याच्या साठी.. लोकांच्या समाधनासाठी!

या उलट… एखाद्या स्त्रीचे नुकतंच लग्न झालं असेल.. लग्न होऊन चार सहा महीने झाले असतील.. आणि तिच्या नवऱ्याचे अपघाती निधन झाले.. ती रडते आहे.. नवऱ्याने दिलेले प्रेम ती विसरु शकत नाही.. आणि आयुष्यभर एकटं राहण्याचा निर्णय घेते.. तेव्हा लोक तिला तिच्या भावना विसरायला सांगतात.. स्वतः चा विचार कर सांगतात..

थोडक्यात काय… तर ह्या नश्वर जगात भावना सुद्धा लोकांच्या हिशोबाने मनात याव्या लागतात..!
म्हणजे कोणा साठी आपल्याला किती आणि काय वाटायला हवं, हे हा समाज ठरवत असतो.. आणि आपण आपल्या भावना तशाच डांबुन ठेवतो. आपल्या भावना समाजाच्या पॅरामीटर्स प्रमाणे आहेत की नाही हे सतत चेक करत राहतो.. आपण स्वतः ला एका साच्यात अडकवून ठेवत आहोत.. आणि हे आपल्याला कळत सुद्धा नाही..!
म्हणून आपण आपल्या भावना मोकळेपणाने मांडायला हव्या. आणि स्वतः ला ह्या अदृश्य साच्यातून बाहेर ठेवायला हवं. तरच पुढच्या पिढ्या त्यांच्या भावना मोकळेपणाने मांडू शकतील.

– के. एस. अनु