सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “भुतकाळ”

शैलजा कॉलेज मध्ये असताना खुप सुंदर होती.. आणि तिच्या मागे मुलांची लाईन लागलेली असायची.. पण ती कोणालाच भाव द्यायची नाही. तिचा फोकस क्लिअर होता. तिला तिचं ग्रॅजुएशन पूर्ण करायचं होतं.
पण नकळत ती तिच्या बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडली. पण घरचे लव मॅरेज ला परमिशन देणार नाहीत.. म्हणून तिने तो विषय सोडून दिला. आणि त्या बेस्ट फ्रेंडशी बोलणं बंद केलं.
कालांतराने तिचं दुसऱ्या सोबत लग्न झालं. संसार चांगला चालला होता. नवरा बायको फिरायला बाहेर गेले.
आणि तिथे तिची कॉलेज मधली मैत्रीण भेटली. तिने बाकी काही न विचारता शैलजा आणि तिच्या बेस्ट फ्रेंडचा काही संपर्क वगैरे आहे का विचारलं.. शैलजाने तिच्या नवऱ्याची ओळख करून दिल्यावर तिच्या मैत्रीणीने म्हंटलं..”आम्हाला सगळ्यांना तर वाटायचं की तुझं आणि ध्रुवचं लग्न होईल..! ”

तिच्या ह्या वाक्याने शैलजा आणि तिचा नवरा दोघे डिस्टर्ब झाले.
तिला वाटलं की ‘जो विषय ती विसरून आयुष्यात पुढे आली होती.. तो विषय मैत्रीणीने का काढला..!’

तिच्या नवऱ्याला वाटलं की माझ्या आधी हिच्या आयुष्यात कोणी दुसरा होता.. आणि ही गोष्ट हिने माझ्या पासून लपवली..!

नकळत दोघांमध्ये तणाव निर्माण झाला..
पण दोघे जर एकमेकांशी बोलले असते.. तर कदाचित तणाव राहीला नसता..
मैत्रीण तर दोन वाक्य बोलून निघुन गेली. पण ह्या दोघांच्या आयुष्यात अशांति निर्माण झाली.
काही वेळाने दोघे एकमेकांशी बोलले. सगळा प्रकार समजल्यावर दोघे शांत झाले.
प्रत्येकाला एक भुतकाळ असतो. आणि तो वर्तमान काळाशी जोडण्यात अर्थ नसतो. हे दोघांनाही समजलं.

कित्येकदा असं घडतं.. की माणुस एखाद्या बद्दल एखादी जूनी गोष्ट समजली की आपलं त्या व्यक्तिबद्दल असलेलं मत बदलतो. मग ती व्यक्ति आपल्याशी कशी वागत होती, वागत आहे.. ह्या गोष्टींचा विसर पडतो. आणि तिच्या बद्दल दुसऱ्या कोणाकडून समजलेली एखादी जूनी गोष्ट खरी वाटू लागते. आणि जे एक सुंदर नातं बनलेलं असतं.. ते खराब होऊ लागतं.. संपु लागतं.
अशा वेळी आपण कोणाचेही न ऐकता स्वतः ला विचारावे.. की आपले त्या व्यक्ति सोबतचे अनुभव कसे आहेत. आणि मगच कोणत्याही निर्णया वर यावे. हेच योग्य.

– के. एस. अनु