जन्म आणि मृत्यु कोणाच्याच हातात नसतं.. कोणी कधी जन्म घ्यावा.. कोणाचा कसा कधी मृत्यु व्हावा… हे सारं विधीलिखित असतं.
आत्ता कोरोना ह्या महामारीच्या संकट काळात अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक, मित्र मंडळी यांना गमावले आहे. काही जणांवर आई वडील गमावण्याचे दुःख एकत्रच कोसळले… त्यांना सावरायचा वेळ ही मिळाला नसेल..
काही जण कोरोना झाला ह्या भीतीनेच देवाघरी गेले. काहींनी ऑक्सीजन लेवल कमी असताना सुद्धा ऑक्सीजन मास्क न लावण्याचा निर्णय घेतल्याने ते हे नश्वर जग सोडून गेले.
आपल्या आयुष्यातली.. रोज डोळ्यांसमोर दिसणारी व्यक्ती जेव्हा अचानक गायब होते.. मन मानायला तयारच होत नाही.. की ती आता ह्या जगात नाही.. सारखं चुकल्या सारखं वाटू लागतं. समोर हसती- खेळती धडधाकट व्यक्ति अचानक एके दिवशी हे जग सोडून जाते.. तेव्हा तिच्या मागे तिच्या कुटुंबाची फार बिकट अवस्था होते.
दिपालीचं ही असंच झालं. तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. आणि त्यातच ते हे जग सोडून गेले. नेहमी हसते खेळते सुदृढ बाबा जेव्हा अचानक हार्ट अटॅकने वारले.. दिपालीला विश्वास ठेवणे कठीण जात होते. ती मानायला तयारच नव्हती.. तिला प्रिंसेस सारखं वाढवणारे.. तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणारे.. तिच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणारे.. तिला हवं त्या कॉलेज मध्ये एडमिशन घेऊन देणारे.. नेहमी सपोर्ट करणारे.. तिचे लाडके बाबा.. तिला परत कधीच दिसणार नव्हते..! तिच्या आयुष्यतुन ते कायमचे निघुन गेले होते..!
दिपालीला ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं खुप कठीण होतं. तरी ही तिच्या आई साठी आणि छोट्या बहिणी साठी ती हिंमत एकवटुन उभी राहीली.. तिने स्वतः ला मजबूत बनवलं. आणि घराची जबाबदारी उचलली.
एक रात्र झोपेत तिचे वडील तिच्या स्वप्नात आले. तिने त्यांच्याशी खुप गप्पा मारल्या. त्यांनी तिला समजावलं.. आता ती मनापासून खंबीर झाली होती..
मृत्यु आल्याने कोणी दूर जात नसतं.. मनातलं प्रेम त्याला नेहमी जिवंत ठेवतं. आणि आपण जर त्या व्यक्तिसाठी तडफडत राहिलो, तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती कशी लाभणार?
हे सगळं जेव्हा दिपालीच्या वडिलांनी तिला समजावलं.. तेव्हा ती शांत झाली. आणि एकट्यात वडिलांसाठी रडणं बंद केलं.
आता ती खंबीर पणे स्वतः ची आणि घरच्यांची काळजी घेते.
जन्माला आला त्याचा मृत्यु अटळ आहे. हे तिला समजलंय.
आपल्याला ही आता स्वतः ला ह्या गोष्टी समजवायला हव्या.
– के. एस. अनु