सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “राग”

त्याने तिचा हात घट्ट हातात धरला.. त्याच्या थंड हातांमुळे तिच्या तापलेल्या हातांना खुप बरं वाटलं.. आणि नकळतच तिच्या मनाला सुद्धा..!
एवढा वेळ चाललेलं तिच्या मनातलं वादळ एकदम शमलं..! नितीन वरचा राग कुठल्या कुठे गायब झाला.. आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली…
तिचा राग कमी झालेला पाहुन त्याने अलगद तिला मिठीत घेतलं.. तीही शांत झाली होती…
मग त्याने हळूच विचारलं…
“नक्की काय चुकलं माझं? का चिडली होतीस?”

त्याच्या ह्या प्रश्नाने नेत्रा पुन्हा चिडली..!
“म्हणजे ह्याला ह्याची चूक अजुन समजलीच नाही??!!!”
तिच्या मनात पुन्हा वादळ सुरु झालं…
तिने त्याला दूर केलं आणि रागाने किचन मधे निघुन गेली…
नितीन पुन्हा हैराण!
“आता तिच्या मागे जावं की इथेच थांबावं? नको! जातोच…! नाही गेलो तर आणखी चिडेल..!”
असा विचार करत तो ही नेत्राच्या मागे किचन मध्ये गेला.

नेत्रा नितीनसोबत प्रेमाने काही तरी प्लान करायची.. नितीनही होकार द्यायचा… आणि ऐन वेळी तो विसरायचा..! त्यामुळे त्यांच्यात हे शीतयुद्ध नेहमी चालायचं.. आणि कारण असायचं नितीनचं गोष्टी विसरणं…

नेत्राला वाटायचं की तिला आणि नितीनला थोडा वेळ तरी एकत्र चांगल्या पद्धतीने घालवता यावा… म्हणून ती कधी घरातच कैंडल लाईट डिनर किंवा कधी त्याच्या सोयी नुसार मूवी प्लान करायची.. आणि त्याला हज्जारदा सांगायची.. “तुझ्या सोयी नुसार एडजस्ट केलंय.. आज लवकर घरी ये..”
आणि नितीन बऱ्याच वेळा ते विसरून जायचा..
सुरुवातीला नेत्रा समजून घ्यायची… पण तशाच गोष्टी सारख्या सारख्या घडायला लागल्यावर नेत्राला वाटू लागलं की ‘त्याचं प्रेम कमी झालं.. त्याला तिच्या पेक्षा दुसऱ्या गोष्टी जास्त महत्वाच्या झाल्या..!’
आणि म्हणून ती आतल्या आत खचत जात होती…

आज ही तेच झालं.. दोघांना आज नेत्राच्या मैत्रीणी कडे जेवायला जायचं होतं.. मैत्रीण सारखी नेत्राला फोन करत होती.. नेत्रा नितीनची वाट पाहत होती.. त्याला कॉल केले.. त्यानी मीटिंग मध्ये असल्या मुळे उचलले नाही… शेवटी नेत्राने मैत्रीणीला येत नाही असं कळवलं.. आणि नितीनची वाट बघत बसली..
थोड्या वेळाने कपडे बदलणार इतक्यात नितीन आला..
“अरे वा.. काय सुंदर दिसतेस.. कुठे जाऊन आलीस??”

त्याच्या ह्या प्रश्नानी नेत्राला खुप राग आला.. आणि ती बेडरूम मध्ये आली…
नितीनच्या लक्षात आलं की त्यानी काही तरी गडबड केली…
पण काय गडबड झाली ते काही कळेना..!

इकडे नेत्राच्या मनात नको नको ते विचार येत होते.. तिला स्वतः चा ही राग येत होता आणि नितीनचा ही!
रागा रागात तिने स्वयंपाक करायला सुरुवात केली..
आणि नितीन मागून आला.. त्याने तिला स्वतः कडे वळवलं.. आणि प्रेमानी घट्ट मीठी मारली… आधी नेत्राने थोडा सुटायचा प्रयत्न केला.. पण नंतर तिचा राग शांत झाला… आणि तिच्या मनातल्या सगळ्या वाईट गोष्टी जाऊन पुन्हा तिचं मन शांत झालं…!

अनेकदा नवरा बायको मधे अशा गोष्टी घडतात.. कामाच्या ओघात कधी माणुस एखादी गोष्ट विसरतो.. तर कधी एखादा गैरसमज होतो.. पण जर आपण वेळीच ही नाती जपली.. आपल्या मनातलं प्रेम एकमेकांना दाखवलं.. तर नातं कायम राहतं.

जर कधी छोटासा वादविवाद झाला.. थोडंसं भांडण झालं.. आणि दोघांपैकी कोणीच झुकलं नाही… तर ते नातं तुटायला वेळ लागत नाही..
जर भांडण महत्वाचं असेल.. तर नातं गमावल्या जातं… आणि जर नातं महत्वाचं असेल… तर भांडण विसरावं लागतं… हाच प्रत्येक नात्यासाठी नियम असावा…

रागात घेतलेला कोणता ही निर्णय नातं टिकवण्यासाठी कधीच उपयोगी पडत नाही.. पण राग जर शांतपणे व्यक्त केला.. तर त्यावर उपाय शोधायला मदतच होते…
म्हणून रागावर नियंत्रण असेल, तर प्रत्येक नातं टिकेल.

– के. एस. अनु