“कर तू लग्न.. पण पुढे कधी ही काही प्रॉब्लेम आला तरी आम्हाला सांगायला येऊ नकोस..! तुझ्या आवडीच्या मुलाशी लग्न करतेयस.. पुढे जे काही बरं वाईट होईल.. त्याला जबाबदार तूच असशील..!”
श्रावणीच्या वडिलांचे बोल आज तिला आठवत होते. कॉलेज मध्ये प्रेम झालं.. मुलगा अगदी साधा, सरळ, लाजरा.. कधी तिच्याशी रागाने बोलला नाही.. कधी तिला दुखवलं नाही. तिची चुक झाली तरी प्रेमाने समजून घेतलं..! अगदी तिच्या वडिलांसारखं..!
तिला तिच्या नवऱ्याच्या रुपात वडील मिळतील.. ही खात्री तिला झाली होती.. म्हणून तिने घरच्यांना त्याच्या बद्दल सांगितलं.
पण ..
ह्या वेळी तिचे वडील तिच्या मताशी सहमत नव्हते. तो मुलगा त्यांना आवडला नव्हता. त्याची कमाई कमी होती. घर लहान होतं.. स्वभाव अजुन समजला नव्हता.. लगेच लग्नाचं डिसीजन कसं घेणार??
तिचे वडील थोडं थांब म्हणत होते.. पण त्याच्या घरच्यांना घाई झाली होती. त्यामुळे त्यांनी तिला सांगितलं.. की ‘ह्याच्याशी लग्न करायचं तर लगेच करावं लागेल.. वाट बघण्या ऐवजी आम्ही दुसऱ्या मुलीशी त्याचं लग्न लावून देऊ..!’
त्याला गमवायच्या भीतीने तिने वडिलांशी भांडण केलं. आणि त्यांच्या मर्जी विरुद्ध त्याच्याशी लग्न केलं.
वडीलच ते.. थोड्या दिवसांनी करतील माफ..! असं म्हणून तिने स्वतः ची समजूत काढली. झालं ही तसंच.. त्यांनी काही महिन्यांनी दोघांना माफ केलं. जावई म्हणून तिच्या नवऱ्याला योग्य तो मान सन्मान दिला.
आणि आता त्याच्या एक एक सवयी तिला समजू लागल्या.. त्यांचे मतभेद होऊ लागले.. त्याच्यातला विकृत ‘तो’ तिला दिसू लागला… तिच्यावर रागवणारा तो दिसू लागला.
आणि तिला तिच्या वडिलांसारखा वाटणारा तो.. गायब झाला..
त्याच्या जागी त्याच्यातला राक्षस दिसू लागला.. आणि तिला तिच्या वडिलांची खुप आठवण आली.. त्यांचे शब्द आठवले.
पण ती त्यांना आता सांगू शकत नव्हती.. की तिला त्याच्याशी लग्न करून पश्चाताप होतोय. कारण तसं सांगितलं तर त्यांनी त्याला मुश्किलीने माफ केलं होतं.. ते पुन्हा त्याचा राग राग करतील. त्याची इमेज त्यांच्या नजरेत खराब होईल..
आणि त्या ही पेक्षा.. तो जर कुठल्या टेंशन मधे असेल.. जे तो सांगू शकत नसेल.. तर ऐन प्रॉब्लेम मध्ये तिने त्याला एकटं टाकलं.. असं होईल..!
आता श्रावणीची कोंडी झाली होती. ती ना माहेरी कोणाला सांगू शकत होती. ना सासरी कोणाची मदत मागु शकत होती..
अशा अनेक श्रावणी आपल्या आजुबाजुला वावरत असतात. ज्या नवऱ्याबद्दल ना सासरच्यांना सांगू शकत ना माहेरच्यांना..! ना मित्र मैत्रीणि.. ना भावाला सांगू शकत.
ओळखीच्या कोणाला सांगायचा तर प्रश्नच येत नाही..! कारण एकाला कळलेली बातमी सगळीकडे बदनामी करत पसरायला वेळ लागत नाही.
अशा सगळ्या श्रावणींना आपण एकच सांगायला हवं.. की,
पर्सनल गोष्टी सगळ्यांना सांगत बसु नका.. पण चुकिचं सहन ही करू नका.. माहेरचे चार बोल बोलतील.. पण पाठीशी उभे राहतील.. सासरचेही जर समजूतदार असतील तर ते ही साथ देतील. आणि त्यांच्या मुलाला आवरतील. आणि कोणीच साथ नाही दिली.. तर स्वतः साठी बोलायला शिकायलाच हवं. नवरा मारतो म्हणून मार खाऊन नाही घ्यायचा. कोणाचा छळ सहन नाही करायचा. जर एकच एक चुकीची गोष्ट सारखी घडत असेल. तर ती थांबवायलाच हवी.
आणि आपण ही हे लक्षात घ्यायला हवं, की जर कोणी विश्वासाने ही अशी गोष्ट आपल्याला सांगत असेल. तर त्या व्यक्तीला आपण काय मदत करू शकतो हे पहावं. आणि जर मदत करता येत नसेल तर मानसिक आधार द्यावा. उगाच स्वतः ची बढाई करण्या साठी त्या व्यक्तिचा पर्सनल प्रॉब्लेम दहा जणांना सांगत बसु नये. आपल्या आधाराने त्या व्यक्तीला धीर द्यावा.
तर अशा श्रावणी फार कमी होतील. आणि कदाचित आपली ही मुलगी त्या श्रावणी मध्ये गणल्या जाणार नाही.
– के. एस. अनु