“अरे यार.. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे…!”
“अरे पण झालं काय??”
“काय म्हणजे…! अरे किती प्रॉब्लेम्स आहेत.. एक असेल तर सांगता आला असता. “
दीपक आणि विश्वास.. दोघांमध्ये चर्चा सुरु झाली होती.. विश्वास कोणत्या तरी विचाराने अस्वस्थ झाला होता.. दीपक नेमकं कारण समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. शेवटी खोदून खोदून विचारल्यावर विश्वास बोलु लागला.
“अरे काय सांगू.. ह्या कोरोनानी सगळं उध्वस्त केलंय.. ना कुठे जाणं-येणं.. ना कोणाला भेटणं… बाहेरचे पदार्थ खाणं बंद… सगळं बंद.. काम धंदा सोडून एवढे महीने घरी अडकवलंय ह्या कोरोनानी..! घरात बसून तरी काय करणार.. सारखं घरच्यांच्या नजरेत हजार प्रश्न दिसतात.. घरातला कर्ता पुरुष जेव्हा घरात रिकामा बसतो.. तेव्हा सगळ्यांच्या डोक्यावर टेंशन येतं.. कामासाठी बाहेर गेलो.. आणि परत आल्यावर जरासा खोकला आला.. की लगेच सगळे असे बघतात जसं मी घरात कोरोना घेऊन आलो..! माझ्या एका कलीगचे वडील कोरोना मुळे गेले समजल्या पासून मला माझ्या लहान मुलांना ही जवळ घ्यायची भीती वाटते रे..! लहान आहेत.. इम्युनिटी स्ट्रॉन्ग नसेल.. उगाच माझ्या मुळे त्यांना काही नको व्हायला.. म्हणून सारखी भीती वाटत असते..! अरे बायकोला ही समजतय माझ्या मनातलं.. पण ती बोलत नाही. जेव्हा कामावर असायचो, मुलांना मोठं होताना बघता येत नव्हतं.. पण आता घरी असून मुलांना दुरुन पहावं लागतं.. किती ही काळजी घेतली, कितीही वेळा आंघोळ केली.. हात धुतले.. तरी मनातली भीती नाही ना धुता येत..! कोरोना मधुन वाचून जगतोय.. पण ह्या विचारांनी पावलो पावली मरतोय रे..!”
विश्वासचं म्हणणं दीपकला समजत होतं.. परिस्थितीच तशी आहे.. की कोणाच्याही मनात हे विचार येणारच..! पण विश्वासला सावरणंही गरजेचं होतं.
थोडा विचार करून दीपक बोलु लागला..
“विश्वास.. जी परिस्थिती आहे, ती तर आपण बदलू शकत नाही.. पण आपण आपले विचार नक्कीच बदलू शकतो. तसं पाहायला गेलं तर तू बाहेर असताना किंवा घरात असताना शासनाने सांगितलेले नियम पाळलेस तर तुला कोरोना होण्याची संभावना फार कमी आहे.. त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. आणि मुलांच्या बाबतीत मुलांपासुन दूर राहण्याचा निर्णय तुझा आहे.. जो तू तुझ्या विचारांतल्या भीती पोटी घेतला आहेस. मनातली भीती काढून टाकलीस तर तो प्रॉब्लेम ही सॉल्व होईल. तू सगळ्यात आधी मनावर ताबा मिळव. तू तुझ्या विचारांवर ताबा मिळव.
तू हा विचार का नाही केलास.. जेव्हा तू कामावर असायचास.. तुला मुलांना मोठं होताना बघता आलं नाही… आणि जेव्हा आज तू त्यांना पाहतो आहेस.. तेव्हा अंतर ठेवून पहावं लागतं म्हणून दुःखी होतोस?? अरे किमान तुला त्यांच्या सोबत राहायला, जगायला, गप्पा मारायला, बोलायला.. त्यांचा अभ्यास घ्यायला मिळतंय.. ह्याचा आनंद मानायला हवास.
आणि कर्ता पुरुष घरी बसला म्हणशील.. तर तसे सगळेच घरात आहेत. त्यामुळे जे क्षण फॅमिली सोबत जगायला मिळत आहेत.. त्यांना असे वेडेेवाकडे विचार करून वाया घालवु नकोस..!”
विश्वासला दिपकचं म्हणणं पटलं. आणि वाईट विचार मनातून काढून टाकायचं त्याने ठरवलं..आणि हे नुसतं ठरवताच त्याला डोकं हलकं झालं असं वाटू लागलं.
आपल्या बाबतीत ही अनेकदा असं होतं. आपण एखाद्या गोष्टीचा, एखाद्या घटनेचा अति विचार करत राहतो. आणि स्वतः ला त्रास करून घेत राहतो. जे क्षण मिळालेत ते टेंशन आणि दुःखात घालवण्यापेक्षा मनात चांगले विचार आणून चांगल्या पद्धतीने घालवु शकतो.
अनेकदा आपले विचारच आपल्या सुखाचं किंवा दुःखाचं कारण असतात. वाईट विचार आपल्याला दुःखी करतात.. चांगले विचार आपल्याला यशस्वी बनवतात. त्यामुळे विचार कसे करायचे हे आता आपल्याच हातात आहे..
ते म्हणतात ना.. ग्लास अर्धा रिकामा आहे, की अर्धा भरलेला.. हे पाहणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असतं.. तर कोणत्या गोष्टीकडे कोणत्या नजरेने बघायचं हे आता आपणच ठरवायला हवं. आणि आपलं आयुष्य आणखी आनंदी बनवण्याकडे पाऊल उचलायला हवं.
- के. एस. अनु