“जेव्हा हीरो हिरोईनला मिठीत घेतो ना… असं वाटतं.. मला ही कोणीतरी मिठीत घ्यावं… मला ही कोणी तरी मनभरुन प्रेम द्यावं. प्रवास करताना एखादा मुलगा माझ्या बाजूला जरी बसला ना.. तरी असं वाटतं.. त्याचा मला स्पर्श व्हावा. त्याने किमान माझा हात तरी धरावा. मला अजिबात समजत नाही.. माझ्या भावना माझ्या ताब्यात नसतात.. खुप बेचैन होते मी!”
प्रेरणा तिच्या बेस्ट फ्रेंडला लीनाला सांगत होती.
लीना तिच्या सोसायटीमध्येच राहणारी. प्रेरणापेक्षा दोन वर्षांनी मोठी.. अभ्यासू… पण लहनपणापासून दोघी एकत्र खेळुन वाढलेल्या.. एकाच शाळेत जाणाऱ्या.. त्यामुळे त्यांची मैत्री ही वाढली. आणि इतकी वाढली की शाळा आणि खेळा व्यतिरिक्त ही दोघी भेटत असत.
प्रेरणा मध्ये जेव्हा शारीरिक बदल घडायला लागले.. तिच्यात होणारे मानसिक बदल तिला जाणवू लागले. कोणाशी बोलावे हे तिला समजेना. पण ते बदल तिला आवडू लागले होते.
आज असंच दोघी टीव्हीवर पिक्चर पाहत होत्या. आणि हीरोने हिरोईनला जवळ घेतलं. ते पाहुन प्रेरणाच्या मनातल्या भावना तिने विश्वासाने लीनाला सांगितल्या.
“मला ही असं फील व्हायचं..”
लीना म्हणाली.
“खरंच???”
“हो. त्या भावनांमध्ये कधी कधी काय बरोबर…काय चुकिचं.. समजत नाही. आणि माझ्या कडून ही अशी चुक घडली…!”
“चुक??? कसली चुक???”
“एकदा मी बसने प्रवास करताना माझ्या बाजूला एक मुलगा बसला होता. दिसायला ही छान होता. न राहवून मी त्याच्या हाताला स्पर्श केला. त्याला माझ्या भावना समजल्या असाव्या बहुतेक.. त्यानेही काही न बोलता माझा हात त्याच्या हातात धरून दाबला..!”
” मग??”
“मग काय… एकाच वेळी हजारो मुंग्या माझ्या शरीरातून मेंदूकडे धावू लागल्या.. खुप खास वाटला तो स्पर्श.. अगदी मोहरुन गेले मी..!”
“मग??”
“मग हळूहळू रोजच तो किंवा त्याच्या मित्रांपैकी कोणी माझ्या बाजूला बसायला लागले.. मला चिकटुन बसायचे.. आधी माझ्या हाताला.. मग पाठीला स्पर्श करायचे.. त्यांच्या वागण्यातून हे समजलं.. की त्यांच्यात माझ्या बद्दल बोलणं झालं असावं.. आणि त्यांना मी कोणाही सोबत जाणारी मुलगी वाटले असावे.. मला ते वागणं आवडेनासं झालं.. स्वतः च्या वागण्याची लाज वाटू लागली. माझ्या एका इच्छेमुळे मी स्वतः ची इमेज खराब करून बसले..! तेव्हा पासून मी त्या बसने क्लासला जाणं सोडलं. मला माझी चुक समजली होती.. मी खुप विचार केला.. आणि एका निष्कर्षावर आले.”
“कोणत्या?”
” हे प्रेम, लग्न.. शारिरीक जवळीक.. ह्या गोष्टी आयुष्यात लग्ना नंतर होणारच आहेत.. मग त्या गोष्टींसाठी उतावीळ का व्हायचं..! ज्या वयात जे करायला हवं.. तेच करूया..“
“बरोबर आहे.. आता मलाही अशा फीलींग्स आल्या की मी इग्नोर करणार.. आणि अभ्यासावर लक्ष देणार…माझ्या साठी ही कोणी तरी कधी तरी येईलच.. “
“अगदी बरोबर..!”
- के. एस. अनु