“मम्मा… आज मला सगळ्या फ्रेंडस नी चिडवलं…”
सोहम रडतच घरी आला…
त्याला रडताना पाहुन त्याचे आई बाबा धावत त्याच्या जवळ गेले..
“काय झालं? कोणी मारलं का??” आईनी काळजीने विचारलं.
“कोण काय बोललं माझ्या शुपरमॅन ला?”बाबा म्हणाले..
डोळे पुसत सोहम सांगू लागला… ” आज आम्ही बंटीच्या घरी जेवायला गेलो होतो.. तिथे मला सगळ्यांनी मुलगी मुलगी म्हणून चिडवलं..!”
“का? असं काय केलंस तू मूली सारखं?” आईने विचारलं..
“मी फक्त त्याच्या आईला मदत केली.. माझं जेवून झाल्यावर मी माझ्या प्लेट मधलं खरकटं डस्ट बीन मधे टाकलं.. आणि प्लेट धुवायला टाकली.. ”
“मग?”
“मग तेव्हा पासून मला तो पंकज मुलगी मुलगी म्हणत होता.. ! सगळे हसायला लागले माझ्यावर.. मग मला रडायला आलं.. ”
“ह्यत्तीच्या एवढंच ना???” बाबा म्हणाले..
सोहमने रडतच होकार दिला..
“अरे, तुला माहिती आहे का??? ते तुला चिडवत नव्हते काही..! सुपर मॅन म्हणत होते..!”बाबा म्हणाले.
“नाही.. ते मुलगीच म्हणाले..!” सोहम ठाम होता..
“अरे तेच ते..! तुला माहिती आहे का.. मुलगी पण सुपर मॅन च असते..!”
“ते कसं?”
“हे मला एक्सपेरिमेंटनी समजलं..!”
“एक्सपेरिमेंट??? कसला एक्सपेरिमेंट पप्पा???”
“अरे, त्याचं काय आहे.. तुझ्या जन्माच्या आधी.. माझ्यात आणि तुझ्या मम्मी मधे मोट्ठी फाईट झाली होती..! मी म्हणालो – तू मला ऑफिसच्या कामात मदत करतेस का??? नाही ना?? मग मी पण तुला घरातल्या कामात मदत करणार नाही..! झालं..! मग मम्मीनी संप केला…!”
“संप!!” सोहमला आश्चर्य वाटलं..
“हो.. संप..! घरातलं काम करणार नाही असं तिने ठणकावून सांगितलं..!”
“मग?????”
“अरे मग काय… मी पण म्हंटलं.. जा…! करेन मी एकटा..! मला काय येत नाही असं समजू नकोस…! आणि नेमका तो रविवारचा दिवस! ऑफिसला सुट्टी..!”
“मग??”
“अरे मग काय..लागलो घर आवरायला.. आधी माझा बेड आवरला.. मग चादरींच्या घड्या घातल्या.. सगळं घर झाडलं.. तुझ्या आई ला खुन्नस देत सगळं घर पुसलं.. म्हंटलं एक्सरसाइज होतेय..! बॉडी बनेल..!”
“ही ही…! मग??” बाबा ज्या आविर्भावात सांगत होते, सोहमला फार मजा वाटत होती.. आणि त्याची आई सुद्धा गालातल्या गालात हसत होती..
“अरे मग काय..! घर आवरलं.. कपडे धुवायचे म्हणून भिजत घातले.. मग मस्स्त चहा आणि पोहे बनवले.. हॉस्टेल वर राहून एवढं शिकलोच होतो बनवायला.. मग मी आणि आईनी माझ्या हातचे पोहे खाल्ले.. मग अजुन मसल्स बनवायच्या म्हणून हातानी कपडे घासले.. मग पाण्यात बूचकळून धुतले..
आणि त्या कपडयां बरोबर मी पण धुतला गेलो..!! ते कपडे पिळुन वाळत घालायचा जोर ही माझ्यात नव्हता..!”
“मग तुम्ही हारलात???”
“छे!! मी पुरुष होतो..! म्हणजे आत्ता ही आहे..! पण तेव्हा मला गर्व होता.. मी जास्त काम करतो.. आणि तुझी मम्मी काहीच काम करत नाही ह्याचा..! मी कसा हार मानणार!! मी कसं बसं कपडयांचं काम केलं! मग जेवण बनवायचं होतं..! जेवणात पोळ्या तर हव्याच..! पण जोर कुठेय हातात..??? तरी पण कशाबशा पोळ्या केल्या.. भाजी केली.. तोपर्यंत अर्धमेला तर झालो होतोच..! जेवायचे ही त्राण नव्हते..! तसाच थोडा वेळ बसलो… तर इतका थकवा आला होता.. की माझा डोळाच लागला..! मी किचन मधे च झोपलो..! मग तुझी मम्मी एकदम आली.. तिने जोडीला वरण भात बनवला.. मग मला उठवलं.. आणि आम्ही दोघं जेवलो..! त्या दिवशी मला कळलं.. मला ऑफिस मधे तर एवढं काम नसतं.. पण घरात असणाऱ्या तुझ्या मम्माला भरपूर काम असतं..! तेव्हा पासून मी तिला मदत करायला लागलो..! आणि मग मी ठरवलं…माझा सोहम पण असाच सुपर मॅन व्हायला हवा..! म्हणून तर तुला ह्या गोष्टी शिकवतो..! म्हणून तुला कोणी मुलगी म्हंटलं तर रडायचं नाही…! उलट तुझी ताकद त्यांना दिसते असं समजायचं..!’
“ओक्के पप्पा..!”
सोहमनी खुशीत पप्पांना मीठी मारली.. आणि हे पाहुन सोहम ची आई सुद्धा समाधानी झाली..
अशी शिकवण जर आपणही आपल्या मुलांना दिली.. तर नक्कीच पुढच्या पीढीला त्याचा खुप फायदा होईल..
कित्येकदा एखादी आई आपल्या मुलाला इतकं लाडावून ठेवते.. की त्याला घरातला चमचा सुद्धा उचलु देत नाही.. जेवल्यावर त्याचं ताट तिथेच पडलेलं असतं.. पानातलं खरकटंही तसंच असतं..
मग त्याचं सगळं त्याची आई करते.
जेव्हा अशा सोनू-मोनूचं लग्न होतं.. त्याच्या सुशिक्षित बायकोला ह्या सवयी आवडत नाहीत.. हळू हळू खटके उडायला लागतात.. आणि जर तो सोनू नाहीच सुधरला, तर कालांतराने त्यांचा घटस्फोटही होऊ शकतो..!
त्यामुळे वेळीच आपल्या मुलांना योग्य ती शिकवण द्यायला हवी. आणि हे सर्वस्वी आई वडिलांच्या हातातच असतं..!
– के. एस. अनु