सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “संयम”

“अगं स्नेहल… जरा सगळ्या गोष्टी संयमाने घ्यायच्या असतात. असं आततायीपणा करून काही होत नाही..”

“अहो, संयम बाळगायचा तरी किती! प्रत्येक गोष्टीत काय संयम संयम..! सगळ्या गोष्टी हातातून निघुन गेल्यावर रडत बसायचं का??’

राजेशच्या चुलत भावाशी राजेशच्या राहत्या घरा बद्दल बोलायचं होतं. त्याने त्यांच्यावर प्रोपर्टीची केस टाकली होती. अनेक वर्षांपूर्वी राजेशच्या वडिलांनी त्यांच्या चुलत भावा कडून ते घर विकत घेतलं होतं. पण आता जेव्हा दोघे हयात नव्हते.. आणि प्रोपर्टीची कागदपत्रं राजेश कडे नव्हती.. तेव्हा त्याच्या चुलत भावाने त्यांना घर सोडायला सांगितलं. आणि कागदपत्र नसल्यामुळे त्यांच्यावर पोलिस केस केली.
ते घर मिळवण्यामागचा उद्देश एवढाच होता की ते घर ऐन मोक्यावर होतं. आणि काही हजारांत विकलेल्या त्या घराची किंमत आता करोडोंमध्ये होती.!

शेवटी पैसा नात्यांच्या मध्ये आला. राजेश वर त्याच्या परिवाराला घेऊन रस्त्यावर राहायची वेळ आली.
पण राजेश संयमाने परिस्थिती हाताळत होता. त्याला नातं आणि घर दोन्ही महत्वाचं होतं. पण स्नेहलला तिच्या कुटुंबाची काळजी होती. त्यामुळे राजेशचा संयम तिला त्याचा नाकर्तेपणा वाटत होता. आणि तिचा संयमाचा बांध सूटत चालला होता. त्यामुळे तिची चिडचिड होत होती.
स्नेहलच्या चिडचिड करण्यामुळे नेमकं काय करावं हे राजेशला समजत नव्हतं. तो थोडा वेळ एकांतात विचार करत बसला आणि त्याला त्यावरचा मार्ग सापडला!

अनेकदा आपण ही आपला संयम गमावून बसतो. आततायीपणाने स्वतः वरचा आणि सिचुएशन वरचा ताबा गमावतो.
जे प्रॉब्लेम शांतपणे सुटणार असतील.. त्यात आपण उतावीळपणे, आततायीपणे आणखी गुंतागुंत करून ठेवतो.
अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं.. तर गणेश उत्सवा मध्ये जेव्हा आपण गणेश मूर्तीची स्थापना करतो.. पूजा करतो.. तेव्हा त्या गणेशाला आपण जानवं घालतो. ते जानवं सोडवताना आपण किती नाजुकपणे सोडवतो.. उतावीळ होऊन घाई घाईने सोडवायला गेलो तर त्याचा कसा गुंता होतो..
तसेच काहीसे आयुष्याच्या बाबतीत होते..
आपण शांतपणे समस्या सोडवू शकतो. उगाच भांडण, वादावादी, मारामारी याने प्रश्न गुंतुन पडतात. आणि आपल्या सर्वांचा मान- सन्मान.. ईगो वगैरे मध्ये येतो.
मग प्रॉब्लेम असतो एक आणि विषय वाढत जातो भलतीकडेच!
म्हणून जमेल तेवढ्या गोष्टी संयमाने घ्यायच्या. पण जिथे हालचाल करणे आवश्यक असेल तिथे योग्य ती हालचाल ही करावी.
म्हणजे आयुष्य सोप्पे होईल.

– के. एस. अनु