“मी ह्या गोष्टीवर कसा विश्वास ठेवू???”
सान्वीची आई विचारात पडून म्हणाली…
विषय होता ही तसाच.. सेंसिटिव.!
सान्वीने खुप हिंमत करून तिच्या आईला सांगितलं होतं.. की तिच्या मामाने तिला चुकीच्या जागी स्पर्श केला होता.. आणि तो तिला अजिबात आवडला नव्हता.
आधी सान्वीला वाटलं चुकुन झालं असेल.. पण जेव्हा तोच प्रकार परत घडला होता.. तेव्हा तिने आईला सांगायचा निर्णय घेतला.
आधी कोणत्या शब्दात सांगावं हे तिला समजत नव्हतं. पण तिने तिच्या परिने आईला समजावून सांगितलं. आणि ते ऐकून सान्वीची आई हैराण झाली..! तिच्या सख्या भावाकडून तिला ही अपेक्षा अजिबात नव्हती.
पण आपली मुलगी सांगतेय म्हंटल्यावर तिने निर्णय घेतला.. भावाला तोंडावर विचारलं.. सान्वीला बघून तिच्या मामाची नजर खाली गेली.. त्या दिवसा पासून सान्वी सगळ्यांपासुन अंतर राखून वावरायला लागली. मामाला द्यायची ती शिक्षा तिच्या आईने दिली. त्यामुळे सान्वी आणि तिच्या आईचं नातं आणखी मजबुत झालं. आणि आपण आईसोबत सारं काही शेअर करू शकतो हा विश्वास सान्वीला मिळाला.
तिकडे राजेशच्या आईने राजेशला खुप मारलं. कॉलेजला जाणारा राजेश आणि सातवी आठवीत शिकणारी त्याची बहीण मुग्धा.. मुग्धाने आईला सांगितलं की घरात दोघेच असताना राजेशने तिच्या शरीराच्या प्रायवेट भागांना हात लावला.. आणि नको तिथे दाबलं.. ते ऐकून आईने राजेशला खुप मारलं.. आणि ” हिंमतच कशी झाली तुझी? ” असं आईने विचारल्यावर त्याने सगळं खरं खरं सांगितलं.. की तो झोपेत असताना मुग्धा त्याचा हात स्वतः च्या शरीरावरुन फिरवत होती.. आणि त्या स्पर्शाने खुश होत होती.. ते त्याला आवडलं नाही.. म्हणून तो घरा बाहेर निघुन गेला. आणि ह्या गोष्टीचा राग येऊन मुग्धाने आईला खोटं सांगितलं.!
आई दोघांना ही लहानपणापासून ओळखत असल्याने तिला समजलं.. की राजेश खरं बोलतोय.. पण मुग्धाला आवर घालणं गरजेचं आहे. म्हणून तिने एकट्यात मुग्धाला समजावलं.
तसं बघायला गेलं तर अनेकदा पालक मुलांवर खोटं बोलतो किंवा बोलते म्हणून विश्वास ठेवत नाहीत.. मग मुलांना जर खरंच ते प्रॉब्लेम मधे असतील तर बाहेर मदत मागावी लागते..
आणि कित्येकदा पालक मुलांवर इतका विश्वास ठेवतात की मुलांना वाटतं की आपलं कोणतं ही खोटं सहज पचेल.. आणि आपलं नुकसानही होणार नाही..!
कित्येकदा असं होतं.. की सगळ्या गोष्टी मोकळेपणाने बोलणारे मुलं मुली त्यांना कोणी वाईट स्पर्श केला तर घरच्यांना सांगू शकत नाहीत.. घाबरतात.. त्यांना वाटतं घरचे विश्वास ठेवणार नाहीत..
त्यामुळे वयात येणाऱ्या किंवा समजायला लागलेल्या मुलांशी पालकांनी ह्या विषयावर चर्चा करायला हवी. तुला कोणी चुकीच्या अर्थाने स्पर्श केला तर लगेच मला येऊन सांगायचं.. त्या व्यक्तीवर ओरडायचं..आणि त्या व्यक्तिपासुन जमेल तेवढं दूर पळायच..! हे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना सांगायला हवं. आणि कोणत्याही प्रॉब्लेम मधे मी तुझ्या सोबत आहे हा विश्वास द्यायला हवा. पण त्याच वेळी .. तुझी वाटेल ती चुक पोटात घालणार नाही असा ईशारा ही द्यायला हवा.
जनरेशन बदलते आहे.. लहान मुलं सुद्धा खुप हुशार बनत आहेत. त्यांच्या वयापेक्षा त्यांना जास्त समजतं.. लवकर समजतं..
त्यामुळे योग्य संधी पाहुन मुलं, मुली दोघांना ही हे सांगणं – समजावणं गरजेचं आहे. तरच पालक आणि मुलांचं नातं आणि त्याचं भविष्य सेफ राहील.
अशा अनेक घटना अनेकांच्या बाबतीत घडतात.. कधी त्रास देणारी व्यक्ति अनोळखी असते.. तर कधी अगदी जवळची.!
त्यामुळे कोणी ही असो.. कोणाचा वाईट स्पर्श सहन करायचा नाही.. आणि कोणावर खोटा आरोप कधीच लावायचा नाही.. हे मुलांना शिकवायला हवं. कारण एक ना एक दिवस खरं समोर येतंच.. आणि खोटं बोलणाऱ्याची इमेज लोकांच्या नजरेत खराब होतेच!
म्हणून मुलांशी वेळीच बोलून घ्या.. आणि त्यांचं आयुष्य सोप्पं करा.
– के. एस. अनु