नेरळ : कर्जत तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून याकडे लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागानेदेखील दुर्लक्ष केले आहे. कोणीही या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याने नेरळ-कोल्हारे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी स्वतः स्वखर्चाने या रस्त्यांची साइडपट्टी आणि रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.
तहसील कार्यालयात दररोज हजारो नागरिक हे अनेक कामानिमित्त कर्जत तहसील कार्यालायत येत असतात. तसेच येथे जवळच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यालयदेखील आहे. येथेही अनेक नागरिक ये- जा करत असतात; परंतु हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही.
त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना कोणताही अपघात होऊ नये, यासाठी नेरळ -कोल्हारे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी शासनाला, आणि लोकप्रतिनिधींना लाजवेल असे काम हाती घेतल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तसेच शासन यापुढे तरी कर्जत तहसील कार्यलयाकडे जाणारा रस्ता चांगल्या दर्जाचा करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.