भोपाळ : गरोदर महिलेची सिझेरियन प्रसुती करताना घाईगडबडीत डॉक्टरांकडून एक कपड्याचा तुकडा तिच्या पोटातच राहिला. प्रसुतीनंतर तिला मुलगा झाला. आरएस दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ही महिला घरी आली. पण, नंतर तिच्या पोटात दुखू लागले. यानंतर तिची सोनाग्राफी केली असता पोटात कपडा असल्याचे समजले. तब्बल 25 दिवसानंतर तिचे पुन्हा ऑपरेशन करून हा कपडा काढण्यात आला.
ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडली आहे. महिलेचे नाव मायाबाई असून तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिवसानंतर ती टाके काढण्यासाठी 31 ऑगस्टला दवाखान्यामध्ये गेली होती, त्यावेळी तिने पोटात वेदना होत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. परंतु, डॉक्टरांनी गॅसमुळे असे होत आहे, असे म्हणत तिला पुन्हा घरची वाट दाखवली.
पोटातील वेदना जास्तच वाढल्याने अखेर कुटुंबियांनी तिला दुसर्या हास्पीटलमध्ये नेले, येथे डॉक्टरांनी सोनाग्राफी केली असता पोटात कपडा असल्याचे दिसून आले. हा प्रकार समोर येताच तिच्या कुटुंबियांना घामच फुटला, कारण पुन्हा मायाबाईचे ऑपरेशन करावे लागणार होते. अखेर प्रसुतीच्या 25 दिवसानंतर पुन्हा ऑपरेशन करून तिच्या पोटातून कपडा बाहेर काढण्यात आला. सध्या या महिलेची प्रकृती ठिक आहे.