कोलाड (श्याम लोखंडे ) : कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या आणि कोरोना संकटात अनेकांना मदतीचा हात देणाऱ्या सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयास दोन ‘एरो-२’ (AIRO२) उपकरणे अर्थात मिनी व्हेंटिलेटर व वाशिंग मशीन भेट देण्यात आले. सुमारे आठ लाखाची ही उपकरणे आहेत. सुदर्शन केमिकल्सच्या व्यवस्थापक (सीएसआर व मीडिया) माधुरी सणस यांनी या मशिन्स उपजिल्हा रुग्णालय प्रमुख डॉ. अंकिता खैरकर यांच्याकडे गुरुवारी सुपूर्त केल्या. सुदर्शन केमिकल्सचे रुपेश मारबते, अमित भुसारे उपस्थित होते.
या उपकरणामुळे रुग्णास श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर आद्रतायुक्त व उबदार श्वसनाचा फायदा होईल. हे मशीन रुग्णाच्या आवश्यकतेनुसार मिनिटाला २ ते ६० लिटरपर्यंत फ्लो पुरवू शकते. तसेच हे उपकरण एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येऊ शकते. याला आपण एक प्रकारे पोर्टबल ‘आयसीयू’ म्हणू शकतो. ‘सुदर्शन’ने दिलेल्या या देणगीबद्दल डॉ. खैरकर यांनी आभार मानले. तसेच रोह्यातील रुग्णांना या उपकरणांची चांगली मदत होईल, असे नमूद केले.
याआधीही सुदर्शन केमिकल्सने सामाजिक बांधिलकी जपत भरीव सेवाकार्य केले आहे. त्यामध्ये साडेतीन लाखांची औषधे, पीपीई किट्स, २० हजारपेक्षा जास्त मास्क, गरजू नागरिकांना धान्याचे किट वाटप केले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयास गरजेनुसार सुरक्षारक्षक पुरवणे, ऍम्ब्युलन्स देणे, पाण्याचे टँकर पुरवणे, परिसराचे निर्जंतुकीकरण आदी गोष्टी सुरु आहेत. निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या नागरिकांनाही मदत करण्यात आल्याचे माधुरी सणस यांनी सांगितले.