अलिबाग : सुधागड-पाली तालुक्यातील पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पर्यायी जागा शोधून ग्रामीण रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे निर्देश पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला आज येथे दिले.
सुधागड-पाली तालुक्यातील पाली येथील ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्याच्या दृष्टीने ऑनलाइन महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे उपसंचालक डॉ.गौरी राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरे, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मढवी, श्री.सुरेश खैरे, श्रीमती गीता पालरेचा, श्री.पोंगडे महाराज यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, या ग्रामीण रुग्णालयाच्या नियोजित जागेची मोजणी प्रक्रिया, सातबारा नोंदणी, जिल्हा शल्य चिकित्सकांना जागेचा ताबा देण्याची कार्यवाही आणि नव्या बाजारभावाने बांधकाम अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी.तसेच ग्रामीण रुग्णालय सुरू होईपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू राहणे आवश्यक असल्याने ते तात्पुरते अन्य जागेत स्थलांतरित करण्यासाठी नव्या जागेची चाचपणीही त्वरित करून घ्यावी.
बल्लाळेश्वर ट्रस्टच्या अखत्यारितील लक्ष्मी आय केअर सेंटरची जागा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तात्पुरती पर्यायी जागा म्हणून उपलब्ध होऊ शकते, त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी, रोहा प्रांताधिकारी, सुधागड-पाली तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांनी त्या जागेची पाहणी तात्काळ करावी आणि संबंधित जागा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी योग्य आहे किंवा कसे याची खातरजमा करून बल्लाळेश्वर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे, असे निर्देश देऊन शेवटी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असे सांगितले.