सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; मुंबई पोलिसांसह महाविकास आघाडीला मोठा धक्का!

मुंबई : अभिनेता सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असून सर्व पुरावे मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवावेत, असा निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे न देता आमच्याकडेच असावा, अशी मागणी करणारी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मुंबई पोलिस तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारसाठी हा धक्का मानला जात आहे.

पाटणामध्ये सुशांतचे वडील के. के. सिहं यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेद्वारे अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. हा तपास मुंबई पोलिसांकडेच रहावा, अशी मुंबई पोलिसांची मागणी होती, शिवाय राज्यातील महाआघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांचेही हेच म्हणणे होते.

यावरून काही दिवसांपासून राजकारण देखील तापलेले आहे. शिवाय मुंबई पोलिस विरूद्ध बिहार पोलिस असा सामनादेखील काही दिवसांपूर्वी रंगवण्यात आला होता. मात्र, आता या सर्वावर पडदा पडला असून तपास सीबीआयकडे गेल्याने कुणाकुणाच्या अडचणी येत्या काळात वाढणार हे पाहणे महत्वाचे ठरणारे आहे.

आज याप्रकरणी अत्यंत निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर सर्वसमावेशक आहे. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणार्‍या कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा. तसेच या तपासात सीबीआयला मदत करण्याचे आदेश कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्णयाविरोधात दाद मागण्यासंबंधी विचारणा केली. मात्र कोर्टाने त्यासाठी नकार दिला आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षांची बाजू ऐकून सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर वडीलांना बिहारमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. आता सीबीआय याप्रकरणी कोणाकोणाची चौकशी करणार हे महत्वाचे ठरणार आहे.