सुसह्य उन्हाळयासाठी पोलादपूर तालुक्यात जलनियोजनाची सुरूवात आवश्यक वार्षिक सरासरीकडे यंदा पर्जन्यमानाची वाटचाल सुरू

पोलादपूर (शैलेश पालकर) :  तालुक्यात यंदा प्रथमच दरवर्षीच्या सरासरी पावसाची टक्केवारी पर्जन्यमानाने गाठायला सुरूवात केली आहे. अजूनही पावसाचे हस्त नक्षत्र शिल्लक असताना पोलादपूर तालुक्याने यावर्षी दरवर्षीच्या सरासरीच्या 98.54 टक्के सरासरी गाठली आहे. दरवर्षीपेक्षा जास्त समाधानकारक पाऊस पडत असताना दरवर्षीप्रमाणे उन्हाळयात होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी विविध स्तरांवर लोकसहभागासह व्यापक प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.

पोलादपूर तालुक्याचे सर्वसाधारण पर्जन्यमान 3680 मीमी असून गेल्यावर्षी 4 सप्टेबर 2019 रोजी 4652 मीमी पाऊस पडला होता. 4 सप्टेंबर 2020 पर्यंत 3627 मीमी पाऊस पडला असून दरवर्षीच्या सरासरीच्या 98.54 टक्के सरासरी गाठली आहे.  यंदा केवळ 11 दिवस शंभर मिमीपेक्षा अधिक तर एक दिवस 200 मीमी पेक्षा पाऊस पडल्याची नोंद असूनही सरासरी गाठली गेली आहे.

गेल्यावर्षीचा अपवाद वगळता तालुक्यातील ही सरासरी कायमच असते. गेल्यावर्षी मुबलक पर्जन्यमान असूनही लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जलनियोजन झालेच नाही. परिणामी, 2020 च्या उन्हाळयात कोरोनाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात आलेल्या चाकरमानी व स्थानिक ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, नद्यांचे डोह, पाणवठे व बुडके आदींवर अवलंबून राहावे लागले. याखेरिज, वर्ल्ड बँकेच्या सौजन्याने ग्रामीण भागासाठी मिळालेल्या पाऊसपाणी संधारणाच्या साठवणटाक्या, तालुका कृषी विभाग आणि स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेले साठवण तलाव यशस्वी असून नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यसरकारच्या योजनांतून साकारलेला आडावळे बुद्रुकचा बंधाराही यंदा पुरेसा ओव्हरफ्लो झाला आहे. तालुक्यातील एमआयडीसीचे राजबाजिरे धरण देखील लवकर ओव्हरफ्लो झाल्याने उर्वरित कालावधीत नियोजनबध्द वापर न झाल्यास लवकर रिकामे होण्याचीही शक्यता आहे.

पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाई निवारण आराखडयावरील कृती पंचायत समिती आणि तहसिल कार्यालय या दुहेरी यंत्रणांमार्फत होत असताना राजकीय प्रभावाने पाणीटंचाईच्या वस्तुस्थितीवर लॉकडाऊन काळात पांघरूण घालण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र, जनतेच्या मागणीला अशारितीने उपेक्षित करण्याच्या प्रयत्नांपेक्षा नियोजनाची गरज लक्षात घेण्याची गरज आतापर्यंत कोणत्याही राजकीय सत्ताधिशांना वाटलेली दिसून आली नाही.

तालुक्यात सुमारे 76 गावे व वाडयांमध्ये पावसाळयाच्या अखेरिस साडेतीनशेच्या आसपास संख्येने वनराई बंधारे बांधून गुरे, कपडे धुणे तसेच भाजीपाला कडधान्य शेतीसाठी पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पना दरवर्षी राबविली जाते. यामध्ये लोकसहभाग कमी असतो. मात्र, यंदा मोठया संख्येने चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थ कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गावागावांतून वास्तव्याला आले असताना ग्रामविकासाच्या प्रयत्नांना सहभाग वाढण्याची शक्यता आहे. हस्त नक्षत्राच्या सुरूवातीलाच प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने अशाप्रकारचे बंधारे बांधण्याकामी सुसज्जता ठेवण्याची गरज आहे.