सोमवारपासून मुंबईची लाइफलाइन सर्वसामान्यांसाठी खुली

train

मुंबई : कोविड19 रोखण्यासाठी मार्चपासून तब्बल नऊ महिने मुंबईची लाइफलाइन सर्वसामान्यांसाठी बंद होती. बससाठी लांबच लांब रांग, ट्रफिकमुळे तासन्तास होणारा प्रवास आणि प्रवासात होणारे हाल यामुळे लोकल सेवा कधी सुरू होणार याकडे प्रत्येक मुंबईकर डोळे लावून होता. अखेर ही प्रतीक्षा संपली असून 1 फेब्रुवारीपासून सर्व प्रवाशांसाठी रेल्वेची उपनगरीय सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.

1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वांना रेल्वेने प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणेकरून सर्वांना सुविधा होईल, असेही निर्देश कार्यालयांना देण्यात आले आहेत. या बाबतीतली सूचना मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांनादेखील कळविण्यात आली आहे.

कधी प्रवास करता येईल

सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

कधी प्रवास करता येणार नाही

सकाळी 7 ते दुपारी 12 व दुपारी, 4 ते रात्री 9 या कालावधीत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.